तिलारीग्रस्तांचा कालव्यात ठिय्या सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

दोडामार्ग तिलारीग्रस्तांनी वनटाइम सेटलमेंट प्रश्‍नासाठी आज रात्रीपासून धरणाच्या मुख्य कालव्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे या प्रश्‍नाला पुन्हा एकदा गंभीर वळण लागले आहे.

दोडामार्ग तिलारीग्रस्तांनी वनटाइम सेटलमेंट प्रश्‍नासाठी आज रात्रीपासून धरणाच्या मुख्य कालव्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे या प्रश्‍नाला पुन्हा एकदा गंभीर वळण लागले आहे.

तिलारी प्रकल्पग्रस्त वनटाइम सेटलमेंटच्या मागणीसाठी गेली दोन ते अडीच वर्षे आंदोलने करीत आहेत. आता रक्कम देण्याचा निर्णय होऊनही टीडीएस कापून पैसे दिले जात असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांत नाराजी आहे. या विरोधात आज अचानक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन छेडले. त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की तिलारीग्रस्तांना गोवा आणि महाराष्ट्र शासनाने नोकरीऐवजी पाच लाख रुपये देण्याचे निश्‍चित केले. एकूण 947 प्रकल्पग्रस्तांना ही रक्कम मिळावी या मागणीस शासनाने मान्यता दिली; मात्र यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त आहेत. जिल्हा पुनर्वसन व भूसंपादन विभागाच्या गलथान कारभारामुळे ही स्थिती ओढवली असून प्रकल्पग्रस्त आता आत्महत्येच्या पवित्र्यात आहेत.

प्रकल्पग्रस्तांना 2014 मध्ये पाच लाख देण्याचे निश्‍चित होऊनही अद्याप पूर्ण रक्कम मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. गोवा शासन टीडीएस कापून रक्कम देत आहे. पूर्ण पाच लाख मिळत नसतील तर ते तिलारी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला मान्य नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी वनटाइम सेटलमेंटची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कोणी वालीच नाही. याबाबत दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेणे आवश्‍यक असतानाही त्याला राजकीय रंग देऊन प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल सुरू आहे. या सगळ्याला कंटाळलो असल्याने प्रकल्पग्रस्तांनी हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आम्ही कालव्यात ठिय्या आंदोलन पुकारत असून येथून पुढे गोव्याकडे पाणी जाऊ देणार नाही, असा इशाराही या निवेदनातून दिला आहे.

गोव्याचे पाणी रोखले जाणार
तिलारी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्यातून गोव्याला दिले जाते. सध्या कालव्याची दुरुस्ती सुरू असल्याने पाणी थांबविण्यात आले होते. लवकरच दुरुस्ती पूर्ण करून हे पाणी पूर्ववत गोव्याला सोडले जाणार होते. प्रकल्पग्रस्तांनी कालव्यातच आंदोलन सुुरू केल्याने गोव्याचे पाणी रोखले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप आले आहे.

Web Title: tilari agitation