'सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असेल'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

या वेळी सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य भाजपचे आणि ग्रामपंचायतींवर वर्चस्वही भाजपचे असेल असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.   

रत्नागिर : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संयुक्त दौरा सुरू आहे. शिवसेनेत अंतर्गत प्रचंड नाराजी आहे. नवीन आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्यातच निवडणूक सुरू आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे दुखावलेल्या आणि नाराज शिवसैनिकांच्या मागे मी ठाम उभा आहे. ६० पैकी ५० ग्रामपंचायतीमध्ये मंत्र्यांविरोधात असंतोष असल्याने या वेळी सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य भाजपचे आणि ग्रामपंचायतींवर वर्चस्वही भाजपचे असेल असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.   

भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या गटातटाचे राजकारण शमविण्यात भाजपच्या वरिष्ठांना काहीसे यश आले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने गट आणि आमदार प्रसाद लाड, विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन एकत्रित दिसले. ६ जानेवारीपासून त्यांनी संयुक्त दौरा सुरू केला. याबाबत बाळ माने म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपला चांगले वातावरण आहे.

हेही वाचा - भारत सरकारच्या "नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप' मधून लाखांची शिष्यवृत्ती -

गावपातळीवर निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध नवे शिवसैनिक अशी लढाई सुरू आहे.६० पैकी ५० ग्रामपंचायतीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेकांनी पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. या नाराजांच्या मागे उभे राहून भाजप म्हणून आम्ही त्यांना ताकद देणार. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा असेल. 

विधानसभेला  मानेंना पहिली पसंती

बाळ माने किंवा आमच्यात कोणतेही गटातटाचे राजकारण नव्हते. आम्ही सर्व एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीतून बाळ माने यांचे नाव एक नंबरला असेल, असे प्रसाद लाड यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील नवीन शिवसैनिक सोनिया गांधींचे आहेत; तर जुने शिवसैनिक बाळासाहेबांचे निष्ठावंत आहेत, असा टोला लाड यांनी लगावला.

हेही वाचा - अमली पदार्थातील  रॅकेट शोधण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर  -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this time all grampanyat election dominated by BJP in ratnagiri said bal mane