
नीलेश ओक म्हणाले,...
- रावण ही व्यक्ती नव्हे घराण्याची उपाधी
- पृथ्वीच्या तिरप्या अक्षाटी भारतीय कालगणनेत नोंद
- भारतीय कृषी संस्कृती ही ख्रिस्तपूर्व 45000 वर्षापूर्वी
- ग्रीकाकडे भारतीय संस्कृतीचे पुरावे होते
- भारतीय कालगणनेला खगोलशास्त्राचा पूर्ण आधार
- इतर देशांच्या प्राचीन नावाचा उल्लेख भारतीय ग्रंथात
महाभारताचा काळ हा ख्रिस्तपूर्व 5561 वर्ष
चिपळूण ( रत्नागिरी ) - बदलते भूप्रदेश, भीष्मांनी केलेले आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे वर्णन आणि अनेक पुराव्यांच्या आधारे महाभारताचा काळ हा ख्रिस्तपूर्व 5561 वर्ष असा निश्चित होतो, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन इतिहास संशोधक नीलेश ओक (अमेरिका) यांनी येथे केले.
येथील लोटिस्माच्या वतीने महाभारत व रामायण नेमके घडले कधी या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. अत्यंत ओघवत्या शैलीत रामायण व महाभारतासह वेदातील संस्कृत श्लोक व ऐतिहासिक पुराव्यांची मांडणी करताना ओक यांनी खगोलशास्त्रासह अनेक शास्त्राचे दाखले व्याख्यानात दिले.त्यांच्या व्यासंगाने सारे श्रोते स्तिमित झाले.
लोकमान्य टिळकांपासून अनेक संशोधकांनी महाभारत कालाचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये भीष्मांनी केलेले आकाशस्थ ग्रहताऱ्यांच्या स्थितीचे अचूक निरीक्षण कालगणनेसाठी महत्वाचे ठरते. अन्य संशोधकांनी महाभारताचा काल हा ख्रिस्तपूर्व 1800 ते 6000 असा अनुमानित केला आहे. संशोधकांची मते वेगळी असू शकतात. या शिवाय 200 पुरावे महाभारत कालाची गणना करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्या आधारे महाभारताचा काल हा ख्रिस्तपूर्व 5 हजार 561 वर्षापूर्वीचा असल्याचे म्हणता येते. महाभारताचे युद्ध हे 18 दिवस चालले. महाभारत घडल्यानंतर व्यासांनी हा इतिहास त्यानंतर 18 वर्षानी लिहून काढल्याचा निष्कर्ष निघतो. हे लेखन तीन वर्षे सुरू होते. रामायणाच्या कालदर्शनाच्या बाबतीत लक्ष्मणाने केलेले वर्णन, सुग्रीवाच्या पृथ्वी प्रदक्षिणेचा तपशील उपयोगी ठरतो. रामायण हे ख्रिस्तपूर्व 12 हजार 240 वर्षापूर्वी घडले असा निष्कर्ष निघतो. सुग्रीवांनी पृथ्वी प्रदक्षिणेतील केलीले वर्णने उत्तर अमेरिकेतील भूगोलाशी मिळतीजुळती आढळतात.
या सर्व संशोधनासाठी अनेक पुरावे महत्वाचे ठरतात. राम जन्माच्या वेळचे ऋतुकालाचे वर्णन वाल्मिकींनी करून ठेवले आहे. सरस्वती नदीचा उल्लेख, सतलज नदी पश्चिम वाहिनी होणे यासह भौगोलिक बदल, खगोलीय घटना, संस्कृत ग्रंथ, ग्रंथात असलेली वर्णने, पृथ्वीवरील खंडाचे विलगीकरण, द्वारकेचे पुरावे, रामसेतूची निर्मिती अशा अनेक गोष्टींमधील तर्कशास्त्रीय एकरुपता समजावून घेत ही कालगणना सिद्ध होते.असा दावा त्यानी केला. लोटिस्माचे अध्यक्ष अरुण इंगवले, राम दांडेकर हे होते. सूत्रसंचालन डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.
नीलेश ओक म्हणाले,...
- रावण ही व्यक्ती नव्हे घराण्याची उपाधी
- पृथ्वीच्या तिरप्या अक्षाटी भारतीय कालगणनेत नोंद
- भारतीय कृषी संस्कृती ही ख्रिस्तपूर्व 45000 वर्षापूर्वी
- ग्रीकाकडे भारतीय संस्कृतीचे पुरावे होते
- भारतीय कालगणनेला खगोलशास्त्राचा पूर्ण आधार
- इतर देशांच्या प्राचीन नावाचा उल्लेख भारतीय ग्रंथात