मालवणात भाजप नगरसेवकांचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पालिकेत ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्या प्रकरणाची चौकशी समिती नेमून चौकशी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांवर कारवाई करावी

मालवण ( सिंधुदुर्ग )  : येथील पालिकेत ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्या प्रकरणाची चौकशी समिती नेमून चौकशी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते गणेश कुशे यांच्यासह भाजप नगरसेवकांनी आजपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. चौकशी समिती नेमली जात नाही आणि नगराध्यक्षांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे श्री. कुशे यांनी स्पष्ट केले. 

येथील पालिकेच्या बांधकाम, लेखा विभागात खेळणी बसविणाऱ्या ठेकेदाराकडून 72 हजार रुपयांची लाच पालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने घेतानाचे कथित स्टिंग ऑपरेशन करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ क्‍लिप भाजपच्या नगरसेवकांनी सादर करत नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

नगराध्यक्षांनी  राजीनामा द्यावा  अशी मागणी

नगराध्यक्षांनी नैतिकता स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबतचे सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत चौकशी समिती नेमावी आणि नगराध्यक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून गेल्या आठ दिवसात यावरील कार्यवाही न झाल्याने गटनेते कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पालिका कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. 

72 हजार रुपयांची लाच घेतानाचे कथित स्टिंग ऑपरेशन

त्यानुसार आज गटनेते कुशे यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोर भाजपच्या नगरसेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात उपनगराध्यक्ष राजन वराडकर, पूजा सरकारे, आप्पा लुडबे, पूजा करलकर आदी नगरसेवक आदी सहभागी झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, तालुकाध्यक्ष अशोक तोडणकर, भाऊ सामंत, बबलू राऊत, रविकिरण तोरसकर, राजू आंबेरकर, आबा हडकर, भाई मांजरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. 

चौकशी समिती नेमावी 

येथील पालिकेत झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ चौकशी समिती नेमून संबंधितांची चौकशी करून कारवाई व्हावी. स्वच्छ व पारदर्शकतेचा बुरखा पांघरून विश्‍वासाने निवडून दिलेल्या जनतेचा विश्‍वासघात करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सत्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत नगराध्यक्षांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार श्री. कुशे यांनी व्यक्त केला.  

आचरेकर अनुपस्थित 

पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली होती. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या पालिका सभेतही उमटले. यावेळी आक्रमक भूमिका घेणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची आजच्या उपोषणावेळी मात्र अनुपस्थित प्रकर्षाने जाणवली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Timeless Fasting BJP Councilors Malvan In The Municipality