यंदा झेंडूनेच विक्रेत्यांना तारले ; विक्रीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

शनिवारच्या लक्ष्मीपूजनामुळे दीडशे ते दोनशे रुपये किलोने झेंडूची फुले जोरात विकली गेली.

चिपळूण (रत्नागिरी) : परतीच्या पावसामुळे दसऱ्याला न बहरलेला झेंडू दिवाळीत चांगलाच बहरला आहे. कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने झेंडूची किरकोळ विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारची धनत्रयोदशी आणि शनिवारच्या लक्ष्मीपूजनामुळे दीडशे ते दोनशे रुपये किलोने झेंडूची फुले जोरात विकली गेली.

नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांचा सर्वाधिक वापर होतो. कोकणात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विक्रेते झेंडूची फुले घेऊन विक्रीसाठी येतात. नगदी पीक म्हणून या उत्पादनाला अल्प काळासाठी का होईना, चांगली मागणी आहे. यावर्षी सर्वच शेतमालावर परतीच्या पावसाने अवकृपा केली होती. यात झेंडूच्या फुलांचे उत्पन्नदेखील अडचणीत आले होते.

हेही वाचा - मुलं जवळ नसल्यानं पोळ्यांचा घासबी गोड लागना ; घामाच्या अभ्यंगस्नानात ऊसतोड कामगारांची दिवाळी -

यावर्षी दसऱ्याच्या सुमारास परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ही लागवड वाहून गेली. या अस्मानी संकटातून वाचलेल्या शेतकऱ्यांनी ही लागवड सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये चांगल्याप्रकारे मशागत करून बाजारात पाठवली आहे. त्यामुळे दिवाळीत बाजारात झेंडूच्या फुलांचे ढीग अनेक ठिकाणी दिसून येत असून, दीडशे ते दोनशे रुपये दराने विकले जात आहेत. विशेष म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी फूल विक्रीसाठी स्वतः वाहने घेऊन आले होते. 

झेंडू १६० ते २०० रुपये किलो

बाजारपेठेत फुलांचे दर स्थिर आहेत. झेंडूला प्रतिकिलोला १६० ते २०० रुपये तर शेवंती फुलाला ३०० ते ४०० रुपये दर आहे. लक्ष्मीपूजनासाठी झेंडू, शेवंती फुलांना मागणी असते. दसऱ्याच्या अगोदर पावसामुळे फुले भिजल्याने झेंडू ४०० रुपये तर शेवंती फुलांचे प्रतिकिलोचे दर ६०० ते ८०० रुपयांवर गेले होते.
 

धार्मिक स्थळे खुली असती तर...

दरम्यान, धार्मिक स्थळे खुली असती तर आणखी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री झाली असती, असे फुले विक्रेते दत्ताजी वणनकर यांनी सांगितले.

हेही वाचा -  रत्नागिरीत १० धरणांसाठी आता इमर्जन्सी ऍक्‍शन प्लॅन -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tinkle flower sale good rate for tomorrow in ratnagiri market the rate was 200 rupees per kg