गिरणी कामगारांचा 18 ला चेतावणी मोर्चा

गिरणी कामगारांचा 18 ला चेतावणी मोर्चा

७३५१०
७३५११
गिरणी कामगारांचा १८ ला चेतावणी मोर्चा
कॉम्रेड उदय भट ः कुडाळातील मेळाव्यात प्रश्न सुटेपर्यत लढा देण्याचा नारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः लुटमारीची लढाई करणाऱ्या एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने गिरणी कामगारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करू नये. गाठ आमच्याशी आहे, असा सडेतोड इशारा लोण्याच्या गोळ्यासाठी लढाई करणाऱ्या या सरकारला देत, जोपर्यंत शेवटच्या कामगारांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सर्व श्रमिक संघटना लढा देणार, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी गिरणी कामगार मेळाव्यात आज येथे केले. गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचे घरासहित पुनर्वसन जाहीर करा, या मागणीकरिता मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी १८ जानेवारीला होणाऱ्या चेतावणी मोर्चाला मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
गिरणी कामगार व वारसदारांच्या घरासहीत पुनर्वसनाचे ठोस धोरण जाहीर करण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांच्या शौर्यदिनी १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी सर्व श्रमिक संघटनेमार्फत चेतावणी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी महाराष्ट्र हायस्कूल मैदान ना. म. जोशी मार्ग करिरोड हे जमण्याचे ठिकाण आहे. या मोर्चात सिंधुदुर्गातील गिरणी कामगार व वारसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याबाबत त्यांना मार्गदर्शन व गिरणी कामगारांचे प्रश्न या अनुषंगाने मेळाव्याचे आयोजन सिद्धिविनायक हॉल येथे करण्यात आले होते. या वेळी सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉ. बी. के. आंब्रे, कॉ. शांताराम परब, कॉ. अनंत मालप, कॉ. सुनिल निचम, बाळकृष्ण आगचेकर आदींसह जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते.
भट म्हणाले, ‘‘तुम्ही लढवय्ये गिरणी कामगार आहात संघर्षात सर्वांचे योगदान फार मोठे आहे ही संघटना गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळाले पाहिजे. कामगार आणि वारसदारांचे पुनर्वसन झालेच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सध्या महापुरुषांच्या नावावरून टीका-टिप्पणी होत आहेत. आज महापुरुषांचा अपमान तुम्हाला आठवतोय, पण तुम्ही खरच महापुरुषांसारखे वागताय का?, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे रयतेचे राज्य करताय का?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि महात्मा फुले यांच्यासारखे वागताय का? असा सवाल श्री. भट यांनी सरकारला केला. राज्यातील शिंदे सरकार सुरत गुवाहाटी गोवा करून आलेले लपत छपत आलेले सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच राज्यातील हे सरकार नैतिकेतेने स्थापन झालेले नसून अनैतिक मार्गाने स्थापन झाल्याची टीका त्यांनी करून, गिरणी कामगारांच्या न्यायासाठी सरकारला जाग आणण्यासाठी कामगार व वारसदारांनी संघटित होण्याचे आवाहन केले.
आंब्रे म्हणाले, ‘‘संघर्ष केल्याशिवाय राज्यकर्ते हलणार नाहीत. त्यासाठी आता गिरणी कामगारांच्या वारसांनी पुढे आले पाहिजे. २००१ मध्ये गिरणी कामगारांना घर देण्याचा जो कायदा झाला, तो केवळ आपल्या आंदोलन, उठावामुळेच झाला. गिरणी कामगारांचा हा संघर्ष आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सरकारने ठरवल तर मुंबईत गिरणी कामगारांना घर देण्यासाठी भरपूर जागा आहे. आपण रस्त्यावर उतरलो तर निश्चितच सध्याचे राज्यकर्ते नमतील. घरांची लॉटरी काढायची असेल तर तुटपुंज्या लॉटरी नको तर एकाचवेळी लॉटरी काढून एकाचवेळेला निर्णय घेऊन सर्वांना घरे द्या, ही आमची सुरूवातीपासूनची भूमिका आजही कायम आहे. प्रत्येक कामगाराला घर मिळालेच पाहिजे आणि कायद्यात तशी तरतूदच आहे. मात्र, घर मिळण्यास या राज्यकर्त्यांमुळे विलंब होतोय. त्यासाठी संघटित ताकद त्यांना दाखवून देऊया.’’
दीपक परब यांनी घराबाबत न्याय मिळेपर्यंत, आपण लढा दिला पाहिजे. सरकार कोणाचे असो, त्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. आमचा लढा घरासाठी आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन व शांताराम परब यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com