
माकडतापाबाबाबत सतर्कता बाळगा
76502
बांदा ः माकडतापाबाबत फलक घेऊन जागृती करताना आरोग्य व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
माकडतापाबाबत सतर्कता बाळगा
डॉ. रमेश कर्तसकर ः बांद्यात आरोग्य, वनविभागातर्फे जागृती
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः काजूचा हंगाम सुरू झाला असून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत माकडतापाचे रुग्ण सापडत आहेत. दूषित गोचिड चावल्याने या तापाचा प्रसार होत असून वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी जंगलात जाताना सुरक्षितता घ्यावी. तसेच तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी येथे केले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, वन विभाग, खासगी डॉक्टरांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्य केंद्राच्या आवारात माकडताप जनजागृती व घ्यावयाच्या काळजीचे माहिती फलक लावण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पशुविकास अधिकारी डॉ. अजित मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. टी. आर. चिपळूणकर, निरवडे आरोग्य केंद्राचे डॉ. विक्रम मस्के, आंबोली आरोग्य केंद्राचे डॉ. महेश जाधव, मळेवाड आरोग्य केंद्राच्या डॉ. अदिती ठाकर, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. आर. वालावलकर, दोडामार्ग वनपाल संग्राम जितकर, सागर किनळेकर, पशुधन सहाय्यक मधुकर दाभाडे, दोडामार्ग विस्तार अधिकारी एस. बी. शेळके, सावंतवाडी विस्तार अधिकारी जी. के. भोई, बांदा वनरक्षक संतोष देसाई, माकडताप विभागाचे सहाय्यक सेवक, तपासनीस आदींसह सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी माकडताप बाधित क्षेत्रात जागृती करण्याचे तसेच लोकांना आरोग्यविषयक जागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ताप आल्यानंतर घेण्यात येणारे उपचार, औषधे, जंगलात जाण्यापूर्वी अंगाला लावण्यात येणारे डीएमपी ऑईल, मृत माकडाची विल्हेवाट याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.