सावंतवाडी संस्थानचे विलीनीकरण आणि राजमाता

सावंतवाडी संस्थानचे विलीनीकरण आणि राजमाता

पाऊलखुणा ः भाग - १०७

80508
सावंतवाडी ः येथील याच सत्यविजय पॅलेसमध्ये (आताचे एस.पी.के कॉलेज) पं. नेहरूंचा मुक्काम होता.


सावंतवाडी संस्थानचे विलीनीकरण आणि राजमाता

लीड
राजमाता पार्वतीदेवी यांनी कारभार हातात घेतल्यानंतर काही वर्षांतच देश स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाला आणखी गती आली होती. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या वेगवान हालचालींनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर संस्थाने देशात विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशभरातील ५६५ संस्थानांत सावंतवाडीचाही समावेश होता. यावेळी राजमातांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी यावेळीही खंबीरपणा दाखवत संस्थानच्या लोकशाहीकडच्या वाटचालीला दिशा दिली.
---------------
राजमाता पार्वतीदेवी यांच्या रिजंटपदाच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सावंतवाडी संस्थानचे विलीनीकरण होय. संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचा राज्याभिषेक १९४६ मध्ये झाला असला तरी बराचसा कारभार राजमाता यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. संस्थान भारतात विलीन करण्याच्या निर्णयावेळीही राजमातांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रीयस्तरावर स्वातंत्र्यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले. अखेर १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरा प्रश्‍न होता तो संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्याचा. ५६५ संस्थाने विलीन करून घ्यायची होती. तसे न झाल्यास अखंड, एकसंघ भारत दिसला नसता. अनेक राजांना स्वातंत्र्यानंतरही आपण स्वतंत्र राजे म्हणून राज्य करावे, असे वाटत होते. स्वतंत्र भारताचे पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. संस्थानांच्या विलीनीकरणासाठी ५ जुलै १९४७ ला सरकारने संस्थान खाते स्थापन केले होते. गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल त्याचे मंत्री होते. त्यांनी खमकी भूमिका घेत पुढच्या काही दिवसांत ५६५ पैकी ५६० संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन केली. संरक्षण, दळवळण व परराष्ट्र व्यवहार या तीन विषयांत त्यांनी विलीन होण्यापुरता नऊ कलमांचा एक विलीननामा तयार करून घेतला होता. राजमातांच्या दृष्टीने हा काळ खूप वेगळा होता. याला त्या धीराने सामोर्‍या गेल्या. देशभर स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी लढा सुरू होता. सावंतवाडी संस्थानात मात्र बापूसाहेब महाराज आणि त्यानंतर राजमातांनी लोकशाही मूल्य जोपासणारा कारभार केला होता. यामुळे त्यांना प्रजेमध्ये खूप वरचे स्थान होते. देशाची बदलती गरज लक्षात घेऊन राजमाता पार्वतीदेवी यांच्या कारकीर्दीत सावंतवाडी संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
यानंतरच्या आठवणी त्यांच्या कन्या सत्यवतीराजे उर्फ श्रीमंत संयोगिता घाटगे यांनी ‘स्मृतीदर्शन’मध्ये लिहिल्या आहेत. या संदर्भानुसार विलीनीकरणानंतर काही काळ राजमाता सावंतवाडीतच होत्या. पुढे १९४८ मध्ये परिवारासह हिंडलगा-बेळगाव येथे राहायला गेल्या. खर्‍या अर्थाने कुटुंब आणि स्वतःसाठी त्यांना याच कालावधीत वेळ द्यायला मिळत होता. त्या मुलांना घेऊन रोज सायंकाळी बेळगाव क्लबमध्ये जायच्या. त्या स्वतः टेनिस खेळायच्या. कधीतरी गोल्फ आणि त्यानंतर ब्रिज खेळत असत. मुले त्यावेळी बॅटमिंटन खेळायची. या क्लबमध्येही राजमाता यांची छाप होती. अनेक हस्तींशी ओळख होती. कधीतरी मुलांना घेऊन त्या सहलीलाही जायच्या. त्या स्वयंपाक खूप उत्तम बनवायच्या. रोज एक नवी डिश बनवून त्या मुलांना द्यायच्या. भाजी आणायला त्या स्वतः गाडी चालवत बेळगावच्या मंडईत जात. तेथे त्यांची ''राणीसाहेब'' अशी ओळख होती. सर्वांमध्ये मिसळून जाण्याच्या स्वभावामुळे बेळगावमध्ये त्यांनी वेगळी छाप निर्माण केली.
बेळगाव मुक्कामातील काही आठवणी सत्यवतीराजे यांनी यात नमूद केल्या आहेत. त्यानुसार राजमातांनी हिंडलगा येथे आवड म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या पाळल्या होत्या. एकदा बेळगावला संगीत संमेलनासाठी बडे गुलाम अली खाँ साहेब आले होते. ते श्रीमंत शिवरामराजे यांचे संगीतातील गुरू होते. त्यांचा मुक्काम हिंडलग्यातील बंगल्यावरच होता. त्यांच्यासोबत त्यांचे साथीदारही होते. त्यांना खायला कोंबड्या लागायच्या. त्या साहजीकच राजमातांच्या पोल्ट्रीमधून नेल्या जात असत. यावर त्या नाराज असायच्या; मात्र पाहुण्यांचा मान लक्षात घेता ही नाराजी उघड होत नसे. त्याचवर्षी श्रीमंत शिवरामराजे यांनी संगीत संमेलनात सुवर्णपदक जिंकले. राजमातांना याचा खूप अभिमान वाटला. त्या काळी दीर्घकाळ त्या बेळगावला असायच्या. अधूनमधून त्यांचे सावंतवाडीतही येणे व्हायचे.
संस्थानच्या विलीनीकरणानंतरही प्रजेमध्ये राजमातांबद्दलचा आदर, प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. त्याही प्रजेच्या सुखदुःखात समरस व्हायच्या. १९५३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू सावंतवाडीत आले होते. यावेळी सावंतवाडी संस्थानशी असलेल्या आपुलकीच्या नात्यामुळे त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी राजघराण्यावर होती. या वेळच्या आठवणी राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी नोंदवून ठेवल्या आहेत. पं. नेहरू यांचे आंबोली मार्गे सावंतवाडीत आगमन होणार होते. त्यांच्यासोबत मोरारजी देसाई, भाऊसाहेब हिरे, स. का. पाटील आणि सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजा नायडू अशा दिग्गज प्रभुती होत्या. २८ एप्रिल १९५३ ला आंबोलीतील राजवाड्यात या सगळ्यांच्या चहापाणाचा कार्यक्रम झाला. यानंतर पं. नेहरू सावंतवाडी येथे होणार्‍या सभेसाठी रवाना झाले. त्यादिवशी नेहरू व इतर मान्यवरांचा सावंतवाडीतील सत्यविलास पॅलेस येथे मुक्काम होता. येथे सर्वांची शाही व्यवस्था होती. सावंतवाडीतील जाहीर सभेत नेहरूंसोबत राजेसाहेब शिवरामराजे हे अग्रक्रमाने होते. रात्री नेहरूंना शाही भोजनासाठी दरबार हॉलमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांच्या नियोजित मेनूनुसार इंग्रजी भोजनाचा थाट होता. यावेळी राजमाता पार्वतीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम स्थानिक भोजनही सज्ज ठेवले होते. पं. नेहरूंना सावंतवाडीतील स्थानिक पाहुणचारच जास्त आवडला. ‘‘हे सारे उत्तम असताना इंग्रजी भोजनाचा थाट कशाला?’’ असे विचारत त्यांनी जिलेबी आणि सोलकडीचा मनमुराद आनंद लुटला. शाही भोजनानंतर राजवाड्यातील मोकळ्या जागेत धनगरी नृत्याचा कार्यक्रम आणि राजवाडा परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ व हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. याच्या नियोजनात राजमातांची महत्त्वाची भूमिका होती. नेहरूंनी याचे तोंडभरून कौतुक केले. या सगळ्याचे पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोल असल्याचे त्यांनी सांगितले.
................
चौकट
कायद्यासमोर सगळे सारखे
राजमाता पार्वतीदेवी या कुशल प्रशासक असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या एखाद्या संवेदनशील गोष्टीसाठी खूप मृदू व्हायच्या; मात्र अन्याय होत असेल तर न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभ्या रहायच्या. सावंतवाडी संस्थानात एकदा दरोड्याची घटना घडली होती. त्याचा न्याय करण्याची वेळ आली, तेव्हा संस्थानातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा यात हात असल्याचे पुढे आले. ती व्यक्ती राजमातांची परिचित होती. त्यांनी सक्षमपणे पुराव्यांची छाननी केली. यात संबंधित दोषी आढळल्याने त्याला शिक्षा करण्यात कोणतीही कुचराई केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com