
चिपळूण पालिकेची 7 कोटी 80 लाख वसुली
चिपळूण पालिकेची ७ कोटी ८० लाख वसुली
१६ कोटी थकबाकी ; १५ फेब्रुवारीपासून थकबाकीदारांवर कारवाई
चिपळूण, ता. १० : येथील पालिकेच्या घरपट्टी व इतर शासकीय कर चालू वर्ष मागणी ९ कोटी ८० लाख आणि मागील थकबाकी ६ कोटी २४ लाख, असे मिळून एकूण मागणी सुमारे १६ कोटीपैकी आज अखेर ७ कोटी ८० लाख वसूल झाले आहेत. अद्याप सुमारे ८ कोटीची वसुली शिल्लक आहे. याविषयी नगरपालिकेने कडक धोरण स्वीकारले असून १५ फेब्रुवारीपासून थकीतदारांना कारवाईचा इशारा दिला आहे.
पाणीपट्टी करापोटी चालू वर्ष व मागील थकबाकी मिळून सुमारे २कोटी ५ लाखांपैकी आजअखेर ८० लाख वसूल झाले आहेत. अद्याप १ कोटी ७० लाख येणे बाकी आहे. पालिकेने यावर्षी ऑक्टोबरपासून वसुली मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत प्रत्येक करदात्यापर्यंत बिल, नोटीस व मागणीसाठी वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही करदात्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत कर भरतो, अशी लेखी हमीपत्र दिली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारीपासून अशा पैसे न भरणाऱ्या थकबाकीदार यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पालिकेने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पालिका अधिकारी, कर्मचारी हे गरज पडल्यास पोलिस बंदोबस्त घेऊन थकबाकीदार यांचेकडे मोठ्या संख्येने कारवाइसाठी जाणार आहेत.
अधिनियमातील तरतुदीनुसार मागणी केलेल्या रक्कमेइतकी वस्तूची मालमत्तेची अटकावणी करून पालिकेच्या ताब्यात घेतली जाणार आहे. नियमानुसार या वस्तूची/मालमत्तेची योग्य मुदतीत जाहीर लिलावपद्धतीने विक्री करून थकीत कर वसूल केली जाणार आहे.
१६ मालमत्ता जप्त
थकीत पाणीपट्टीची पाईपलाईन खंडित केली जाणार आहे. आजपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी कोणताही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांपैकी १६ मालमत्ता नगर परिषदने जप्त केल्या आहेत. तसेच सुमारे ४५ नळ कनेक्शन खंडित केली आहेत.