जमीन मोजणी प्रकरणांना येणार वेग

जमीन मोजणी प्रकरणांना येणार वेग

57564

जमीन मोजणी प्रकरणांना जिल्ह्यात आता येणार वेग

मदतनीस घेण्यास मान्यता; जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख संचालकांचे आदेश

ओरोस, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयाला जमीन मोजणी कामाची प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी मदतनीस घेण्याबाबत जमाबंदी आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख संचालक यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील जमीन मोजणी प्रकरणे गतिमान पद्धतीने निकाली निघण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे कार्यरत कर्मचारी अत्यंत कमी संख्येने आहेत; परंतु जिल्ह्यात मोजणी प्रकरणांची आवक मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर मोजणी कामाचा निपटारा करण्याचा मोठा ताण होता. यावर उपाययोजना म्हणून मोजणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदतनीसांची सेवा घेण्यासाठी व त्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सिंधुदुर्ग यांनी ३० जानेवारीला व पुन्हा ८ फेब्रुवारीला वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सिंधुदुर्ग व उपसंचालक भूमअभिलेख कोकण प्रदेश मुंबई यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मदतनीस घेण्यास मान्यता देतानाच मदतनीस घेतल्यावर येणाऱ्या खर्चास जमाबंदी आयुक्त यांनी १२ लाख ६१ हजार २५० रुपये एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. जमाबंदी आयुक्तांनी मदतनीस घेण्यास मान्यता दिल्याने जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मोजणी करण्यास वेग येणार आहे. सध्या सुरू असलेल्या वेगाच्या दुप्पट वेगाने ही मोजणी करता येणार आहे. याचा फायदा नागरिकांना होणार असून नियमित कर्मचाऱ्यांवर असलेला अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.
...............
चौकट
दरदिवशी २५०० मानधन
भूमिअभिलेख कार्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मदतनिसांना दोन प्रकरणे दरदिवशी दिली जाणार आहेत. त्यांना एका प्रकरणासाठी १२५० रुपये दिले जाणार आहेत. याप्रमाणे २५०० रुपये मानधन दिले जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर यांनी सांगितले.
...............
कोट
जिल्ह्यामध्ये भूमिअभिलेख विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी मदतनीस म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत. तसेच सिव्हील डिप्लोमा झालेल्या व्यक्तीही या कामासाठी उपलब्ध होऊ शकतात. जमीन विषयक कामे, ऑटोकॅडचे काम, नकाशा प्रिंटिंगची कामे करणारे खासगी, नोंदणीकृत व्यावसायिक मदतनीस म्हणून उपलब्ध होऊ शकतील. यासाठी पात्र व्यक्ती, संस्था यांनी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सिंधुदुर्ग किंवा तालुकास्तरीय उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com