चिपळूण-बारावीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार

चिपळूण-बारावीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार

पान ३ साठी)


बारावीच्या ऑनलाईन परीक्षेवर
माहिती तंत्रज्ञान शिक्षकांचा बहिष्कार
मधुसुदन माने; अनुदान देण्यास टाळाटाळ; सकारात्मक निर्णयापर्यंत माघार नाही
चिपळूण, ता. १२ : बारावीच्या ऑनलाईन परीक्षेवर माहिती तंत्रज्ञान शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती येथील डीबीजे कॉलेजच्या आयटी विभागातील शिक्षक मधुसूदन माने यांनी दिली. राज्यभरातील शिक्षकांचा बहिष्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, अकरावी व बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखेसाठी शिकवला जातो. या विषयाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा २३, २४ व २५ मार्चला होणार आहे. ही परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक हे तांत्रिक सहाय्यक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची माहिती तंत्रज्ञान विषयास वेतन अनुदान देऊन विषय शिक्षकांना वेतन देण्याची मागणी शासनाने वेळोवेळी मान्य केलेली आहे. मात्र २०१४ व २०१९ मध्ये महासंघाने यशस्वी केलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाची फलनिष्पती म्हणून माहिती तंत्रज्ञान या विषयास अनुदान देण्याचा निर्णय तीन महिन्यात घेऊ असे लिखित आश्वासन शासनाकडून महासंघास दिले होते. त्यानंतर गेली नऊ वर्षे शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महासंघाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा तत्कालीन शिक्षणमंत्री तसेच सचिव स्तरावर बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये हा विषय वारंवार चर्चिला असून शिक्षण विभागाने अर्थमंत्रालयास वेतन अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा असे ठरले होते.
माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांच्या मागणीबाबत जोपर्यंत शासन सकारात्मक निर्णय घेणार नाही, तोपर्यंत माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक १२ वी आयटी ऑनलाईन परीक्षेमध्ये काम करणार नाही. किंबहुना त्या परीक्षेवर सर्व शिक्षकांचा बहिष्कार असेल, असे समजावे.
राज्यातील सर्व नऊ विभागातील अंदाजे दोन हजारपेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे अंदाजे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षा देताना असुविधेचा सामना करावा लागेल, असे माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com