स्वखर्चातून सोडवल्या समस्या

स्वखर्चातून सोडवल्या समस्या

83386
सावंतवाडी : चलवाडी दाम्पत्याचा सत्कार करताना महेश लाखे, दीपक लाखे आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

स्वखर्चातून सोडवल्या समस्या

लाखे वस्तीला आधार; चलवाडी दाम्पत्याचा पुढाकार; सावंतवाडीत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः शहरातील लाखे वस्तीला गेली कित्येक वर्षे भेडसावणारा घराच्या स्लॅब गळतीचा व ड्रेनेज वाहिनीचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांची पत्नी नीलिमा यांनी स्वखर्चातून मार्गी लावला. वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही न सुटणारा प्रश्न चलवाडी दाम्पत्याने मार्गी लावल्याने अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना, सिंधुदुर्ग व श्री रासाई युवा कला, क्रीडा मंडळाच्या माध्यमातून लाखे वस्तीतील रहिवाशांनी त्यांचा विशेष सत्कार करत ऋण व्यक्त केले.
शहरातील जिमखाना मैदानासमोरील लाखे वस्तीला शासनाच्या माध्यमातून घरे मिळाली आहेत. पालिकेच्या माध्यमातून त्या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास ६४ कुटुंबांना घरे मिळाली. या स्लॅबच्या घरांना काही वर्षे झाल्याने पावसाळ्यात स्लॅब गळतीचा प्रश्न लाखे वस्तीला प्रकर्षाने जाणवत होता. यासोबतच ड्रेनेजचा प्रश्नही येथे मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. घरांना ड्रेनेजसाठी बसविण्यात आलेले पाइप खराब झाल्याने येथे अस्वच्छता निर्माण होत होती. लाखेवस्तीतील रहिवाशांनी या संदर्भात वेळोवेळी पालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते; मात्र हा प्रश्न ‘जैसे थे’ होता. एकूणच, यामुळे लाखे वस्तीतील रहिवाशांमध्ये नाराजी होती.
अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर लाखे, श्री रासाई युवा कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सामाजिक कार्यकर्ते अमित लाखे, नरेश खोरागडे, भारत लाखे, गंगुबाई खोरागडे, रघुनाथ लाखे, आरती खोरागडे, छाया पाटील, शिवाजी पाटील, सुभाष खोडागडे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना चलवाडी यांनी भविष्यातही लाखे वस्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
---
समस्येची तातडीने दखल
लाखे वस्तीला भेडसावणारा हा प्रश्न सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या परशुराम चलवाडी यांच्या कानावर येताच त्यांनी तातडीने हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. लाखे वस्तीतील रहिवाशांना विश्वासात घेत त्यांनी तब्बल चार लाख रुपये स्वखर्चाने ६४ कुटुंबांच्या घरांना आतून नव्याने प्लास्टर आणि स्लॅबवर वॉटरप्रूफ प्लास्टर करून दिले. ड्रेनेजसाठी नव्याने वाहिनी करून वस्तीला भेडसावणारा प्रश्न कायमचा मिटविला. चलवाडी दाम्पत्याने लाखे वस्तीसाठी केलेले प्रयत्न पाहून वस्तीतील रहिवाशांनी एकत्र येत त्यांचा सत्कार घडवून आणत ऋण व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com