पान एक-अख्ख्या सिंधुदुर्गात एकच भूलतज्ज्ञ

पान एक-अख्ख्या सिंधुदुर्गात एकच भूलतज्ज्ञ

83533

अख्ख्या सिंधुदुर्गात एकच भूलतज्ज्ञ
---
आरोग्य यंत्रणेची अवस्था; दिशा समितीच्या सभेत झाले वास्तव उघड
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एकच भूलतज्ज्ञ नियमित सेवेत आहेत. जिल्हा रुग्णालयात हे भूलतज्ज्ञ कार्यरत असून, अन्य कुठेच भूलतज्ज्ञ सेवेत नाहीत. त्यामुळे गरज पडल्यास प्रत्येक रुग्णात चार हजार रुपये देऊन ऑनकॉल भूलतज्ज्ञ सेवा घेतली जात आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि देवगड येथे स्त्रीरोगतज्ज्ञ असून, अन्य ठिकाणी ऑन कॉल स्त्री रोगतज्ज्ञांची सेवा घेतली जाते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी आज झालेल्या दिशा समिती सभेत दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची तथा दिशा समितीची सभा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, समिती सचिव तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार बेहरे, विस्तार अधिकारी जगदीश यादव व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी कुडाळ नगराध्यक्ष आफरीन करोल, देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर, संतोष पाटील, शिवदत्त घोगळे, अस्मिता राणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आढावा सुरू असताना सभाध्यक्ष खासदार राऊत यांनी जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती विचारली. यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी जिल्ह्यात भूलतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञांच्या जागा रिक्त जागा आहेत. जिल्ह्यात केवळ चारच स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची पाच पदे भरलेली आहेत. त्या ठिकाणी गरज पडल्यास ऑन कॉल सेवा घेतली जात आहे. राज्यस्तरावर वरिष्ठ पदे भरली जातात. सहा महिन्यांत मात्र एकही पद राज्यस्तरावरून भरले गेलेले नाही. जिल्हास्तरावरही रिक्त पदांसाठी नियमित भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ६६ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले.
खासदार राऊत यांनी पीएमजीएसवाय आणि सीएमजीएसवाय अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दोडामार्ग आणि देवगड तालुक्यांतून जास्त तक्रारी आहेत. त्यामुळे येथील कामांची पाहणी करून अपडेट द्यावी, असे निर्देश या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. जलजीवन मिशन अंतर्गत ६६२ कामे मंजूर आहेत. यातील ६४२ कामांची बक्षिसपत्रे झाली आहेत. केवळ २० कामांची बक्षिसपत्रे रखडली आहेत. तांत्रिक कारणाने ही प्रक्रिया रखडल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी सांगितले. कचरा प्रकल्पामुळे ग्रामपंचायतींवर आर्थिक भार येणार आहे. त्याचा अभ्यास करावा, अशा सूचना जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाला खासदार राऊत यांनी दिल्या.

साटेलीतील इमारत
तत्काळ सेवेत घ्या
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत साटेली-भेडशी येथे नूतन इमारत पूर्ण झाली आहे. त्याच्या उद्‍घाटनासाठी आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांना कळविल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले. यावर खासदार राऊत यांनी चार वर्षे हे काम सुरू आहे. आता इमारत पूर्ण आहे; तर आरोग्यमंत्री उद्‍घाटनास येत नाहीत म्हणून सहा ते सात महिने इमारत रुग्णाच्या सेवेत येत नाही, ही बाब गंभीर आहे, असे सांगून तत्काळ इमारत सेवेत आणावी, असे आदेश दिले.

‘कॉर्पोरेट लूक’
काय बदलला?
खनिकर्म विभागाकडून उपलब्ध सीएसआर निधीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कॉर्पोरेट लूक करण्यासाठी २०१९ मध्ये ९० लाख निधी खर्च केला, असे जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर खासदार राऊत यांनी कॉर्पोरेट लूक म्हणजे नेमके काय काम केले, असा प्रश्न केला. यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी येथे स्वच्छतागृह, प्रसाधनगृहही केले नसल्याचे सांगितले. यावर खासदार राऊत यांनी झालेल्या कामांची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले.

...तर शिस्तभंग कारवाई
सभेत एकूण ४६ विभागांचा आढावा घेण्यात आला. सभेच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यात बऱ्याच विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खासदार राऊत संतप्त झाले. त्यांनी या पुढच्या सभेला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस दिली जाईल. त्यांच्या वरिष्ठांना कळवून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. दरम्यान, सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन्ही कार्यकारी अभियंता, बंदर विभाग अधिकारी यांच्यासह असंख्य अधिकाऱ्यांनी दांडी मारली.


नवीन सदस्य नियुक्त
स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून सोमा घाडीगावकर यांच्याऐवजी जान्हवी सावंत यांची नियुक्ती केली. सरपंच प्रतिनिधी म्हणून कसवणचे मिलिंद सर्पे, कळसुलीच्या भावना तावडे, तळगावच्या लता खोत, केळुसचे योगेश शेट्ये यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com