चिपळूण - उक्ताड बेटावरील गाळ काढण्यास नागरिकांचा विरोध

चिपळूण - उक्ताड बेटावरील गाळ काढण्यास नागरिकांचा विरोध

उक्ताड बेटावरील गाळ काढण्यास नागरिकांचा विरोध

नामने गाळ उपसा थांबवला ; प्रांताधिकारी घेणार बैठक
चिपळूण, ता. २१ ः उक्ताड बेटावरील गाळ उपसाच्या विरोधाच्या नागरिकांनी तक्रारी सुरू केल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही स्थानिक नागरिकांची बाजू घेत नाम आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे उक्ताड बेटावरील गाळ काढण्याचे काम नामकडून थांबवण्यात आले आहे. प्रांताधिकारी दोन दिवसात नागरिकांची बैठक घेऊन हा विषय सोडवतील नंतर काम सुरू होईल, अशी माहिती नाम फाउंडेशनचे तांत्रिक सल्लागार शाहनवाज शाह यांनी दिली.

फाउंडेशनने नुकतेच मल्हार पाटेकर यांच्या उपस्थितीत यंत्रसामुग्री लावत उक्ताड, गोवळकोट धक्का, पेठमाप, बाजारपूल गणेशघाट अशा चारही ठिकाणी गाळ उपसा सुरू केला. गाळ उपसा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून उपसाला विरोध सुरू झाला आहे. उक्ताड येथील बेट आणि तेथील गाळ उपसाचे काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. तेथेच लोकवस्ती असल्याने या बेटावरून तेथे जाण्यासाठी रॅम्प आणि रस्ता असल्याने तेथे नागरिकांचा विरोध वाढत आहे.
दरम्यान, राजकीय नेतेमंडळी नागरिकांच्या बाजूने नाम फाउंडेशनच्या वरिष्ठ समन्वयकांकडे फोनाफोनी करत असल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर येथील गाळ उपसा थांबवण्यात आला आहे. येथे दोन पोकलेन आणि पाच डंपरने गाळ उपसा सुरू होता. उक्ताडमधील कामाला गती प्राप्त झाल्यानंतर आणखी यंत्रसामुग्री लावण्यात येणार होती; मात्र अशातच काम बंद पडल्याने आता प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवळकोट धक्क्यासह उर्वरित ठिकाणाचा गाळ उपसा सुरू आहे. नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या काही भागांचे रेखांकन पूर्णत्वास गेले आहे; मात्र तरीही त्यावर काहींचा खासगी कब्जा असल्याने विरोध होत असल्याचे पुढे येत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना विरोध होत असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष देऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याची तितकीशी अंमलबजावणी प्रशासनाकडून होताना दिसत नसल्याचा सूर उमटू लागला आहे.

कोट
उक्ताड बेटाची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी केली. महसूलकडून मोजणी करून कोणत्या भागात गाळ उपसा केला पाहिजे या संदर्भात आम्हाला लाईनआऊट देण्यात आली त्याच पद्धतीने काम सुरू होते; पण काहींनी मुद्दाम या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात प्रांताधिकारी पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढतील.
- शाहनवाज शाह, तांत्रिक सल्लागार नाम फाउंडेशन, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com