बारावी परीक्षेला सुरुवात

बारावी परीक्षेला सुरुवात

swt2129.jpg
84464
सावंतवाडीः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय केंद्रावर सूचना फलकाचे वाचन करताना बारावीचे विद्यार्थी.

बारावी परीक्षेला सुरुवात
पहिला पेपरः दोन वर्षांनंतर पहिल्यांदा नियमित प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी यंदा पहिल्यांदाच बारावीची परिक्षा ऑफलाईन सुरू झाली. आज मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर झाला. सावंतवाडीत राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयात बारावीचे केंद्र आहे. विद्यार्थी उत्साहाने बारावीच्या पहिल्या पेपरला सामोरे गेले.
कोविडनंतर पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांवर आधारीत ही परीक्षा आहे. कोविडमध्ये लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातील ब्लॉगमध्ये बसावे लागत असल्याने जवळजवळ चार तास केंद्रावर काढावे लागत आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी पुरेपूर उपायोजना करण्यात आली आहे.
यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आजपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मात्र सुरूच होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका काही प्रमाणात बारावी बोर्ड परीक्षा आयोजनाला बसण्याची शक्यता आहे. जोपर्यंत मागण्यांसंदर्भात शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दिला आहे. आजपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असूनही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. त्यामुळे बारावी बोर्ड परीक्षेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात. शिक्षकेतर कर्मचारी दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरीत करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात. बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेसाठी बेंच आणि बोर्डवर नंबरिंग करण्याचे कामही शिक्षकेतर कर्मचारी करतात. परीक्षेच्या आधी किंवा परीक्षा सुरू असताना शिक्षकांना, विद्यार्थ्यांना स्टेशनरी व संबंधित वस्तूंची गरज भासल्यास शिक्षकेतरांकडून त्या पुरवल्या जातात. सातवा वेतन लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतरांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
..............
चौकट
मंत्री केसरकरांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
''कोविड''च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे, यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत व्हाव्यात, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन करतानाच शिक्षणमंत्री केसरकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com