सावंतवाडी आठवडा बाजार पुन्हा चर्चेत

सावंतवाडी आठवडा बाजार पुन्हा चर्चेत

84586
सावंतवाडी ः शहरातील मोती तलावाकाठी आठवडा बाजार भरविला जातो.


सावंतवाडी आठवडा बाजार पुन्हा चर्चेत

जागा कोणती?; होळीचा खुंट परिसरात हलविण्याच्या हालचाली

निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः येथील आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे; परंतु भाजप पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला आहे. केसरकरांनी नागरिक आणि व्यापारी संघटना यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे, पालकमंत्री भाजपचे आहेत हे विसरु नये, असा टोला लगावला आहे. त्यामुळे आता नेमका बाजार कुठे भरणार? याबाबत नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
शहराचा मंगळवारचा आठवडा बाजार पूर्वी गांधी चौक ते उभाबाजार परिसरात भरवला जात होता. मात्र, त्या ठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागल्याने बाजार भरवण्यास विरोध होऊ लागला. त्यानंतर तो पांझरवाडा येथे भरवण्यात आला. तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर कोरोना काळात हा बाजार तात्पुरत्या कालावधीसाठी मोती तलावाच्या काठावर भरवण्यास सुरुवात केली. यासाठी पालिकेने परवानगी दिली होती. गेली दीड वर्षे हा आठवडा बाजार मोती तलावाकाठी भरत आहे.
नुकतीच मंत्री केसरकर यांनी आठवडा बाजार मोती तलावाच्या काठावर भरवला जात असल्याने तलावाच्या सौंदर्यास बाधा उत्पन्न होत आहे. त्यामुळे हा बाजार होळीचा खुंट येथे भरवण्यात यावा, अशी सूचना केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आठवडा बाजाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून वाद सुरु झाला आहे. एकीकडे हा बाजार होळीचा खुंट येथे न भरवता जिमखाना येथील छोट्या मैदानावर भरवण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे आठवडा बाजार होळीचा खुंट येथे नेण्यास भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. ती जागा बाजारासाठी योग्य नसून लांब पल्ल्याची आहे. बाजार तिथे गेल्यास स्थानिक बाजारातील व्यापारी, भाजी विक्रेते यांचे नुकसांन होईल. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शहरातील संस्थानकालीन मोती तलावाचे सौंदर्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून आठवडा बाजार जिमखाना येथील छोट्या मैदानावर भरवला जावा, अशी मागणीही काही जागरुक नागरीकांमधून होत आहे. त्यामुळे आता नेमका बाजार कुठे भरणार? याबाबत नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.
------------
चौकट
मत-मतांतरे
शहरातील बरेच नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोती तलावाकाठीच बाजार भरणे योग्य आहे. या ठिकाणी बाजार भरविल्यामुळे ग्राहकांना एकाच परिसरात सर्व बाजार घेता येणे शक्य होणार आहे. होळीचा खुंट परिसरात बाजार भरविल्यास त्या ठिकाणाहून बस स्टॅन्ड, रिक्षा स्टॅन्ड आणि शहरातील बाजारपेठ याचे अंतर खूप लांब आहे. त्या ठिकाणी शौचालयाची व बाथरूमची कुठलीही व्यवस्था नसल्याने व्यापाऱ्यांसह आणि ग्राहकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे तलावाकाठी बाजार भरविणे योग्य आहे. तर काही जणांकडून जिमखाना येथील छोट्या मैदानावर सावंतवाडीतील आठवडा बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्या ठिकाणाहून बस स्थानक जवळ आहे. पार्किंगची व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही आणि एकाच ठिकाणी कचरा गोळा झाल्यामुळे तो उचलण्यासाठी पालिका प्रशासनाला सुद्धा सोयीचे ठरणार आहे, असे म्हणणे आहे.
------------
कोट
आठवडा बाजाराबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी व सावंतवाडीकरांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसे या ठिकाणी होत नाही. मंत्री केसरकरांनी आठवडा बाजार आणि व्यापारी संकुलाबाबत मांडलेली भूमिका एकतर्फी आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असल्याने तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे असल्यामुळे आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे होते. यापुढे निर्णय घेताना विश्वासात घ्यावे, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. त्यासाठी केसरकारांनी सर्वांना एकत्रित घेऊन बैठक बोलवावी.
- राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप
------------
कोट
मोती तलावाकाठी आठवडा बाजाराचा निर्णय नागरिक व व्यापाऱ्यांना विचारात घेऊनच घेतला आहे. तोच बाजार आता होळीचा खुंट परिसरात नेल्यास त्याचा नाहक त्रास नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे शहराचा मध्यवर्ती भागच योग्य आहे. आठवडा बाजाराबात आमच्या कार्यकाळात योग्य ती चर्चा करुनच निर्णय घेतले आहेत. जेणेकरून सर्व भागात ग्राहक फिरतील आणि त्या ठिकाणी असलेल्या दैनंदिन व्यवसायांना सुद्धा त्याचा फायदा होईल. त्यामुळे बाजार अन्यत्र नेऊ नये. न्यायचा असल्यास पुन्हा नागरिकांना व व्यापाऱ्यांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा.
- संजू परब, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी
-----------
कोट
आठवडा बाजार होळीचा खुंट ते विठ्ठल मंदिर रोड या मार्गावर भरविणे व्यापारी वर्ग व नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांच्या व व्यापारी वर्गाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा. मोती तलाव काठावरच सुरू असलेला आठवडा बाजार योग्य आहे. केसरकर यांनी जाहीर केलेला निर्णय चुकीचा असून त्यांनी घेतलेला निर्णय व्यापारी, नागरिक, व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून घेणे गरजेचे होते. याबाबत फेरविचार आवश्यक आहे.
- शब्बीर मणियार, उपजिल्हा संघटक, ठाकरे गट
----------
कोट
आठवडा बाजार तलावाकाठी भरविला जात असल्याने शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचते हे खरे आहे; मात्र, होळीचा खुंट या ठिकाणी बाजार नेण्यापेक्षा जिमखाना मैदानावरील छोट्या मैदानावर हा बाजार भरवावा. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. बसस्थानकही जवळ असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी जवळ पडेल. एकाच ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी पालिका प्रशासनालाही सोयीचे ठरेल.
- आशिष सुभेदार, जिल्हाध्यक्ष तथा माजी शहरप्रमुख, मनसे विद्यार्थी सेना
-----------
कोट
गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे आठवडा बाजार भरविला जातो, त्याप्रमाणे तो भरवावा. इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या समोर असलेली जागा बाजार भरवण्यासाठी योग्य आहे. बाजारादिवशी तो रस्ता बंद ठेवावा. ग्राहकांना त्याच परिसरात सर्वच वस्तू खरेदी करता येतील. व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. या जागेबाबतही विचार होणे गरजेचे आहे.
- पुंडलिक दळवी, इंदिरा गांधी व्यापारी संकुल अध्यक्ष तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com