गुहागर ः गुहागरच्या सहा नगरसेविका सामंतबंधूंना भेटल्या

गुहागर ः गुहागरच्या सहा नगरसेविका सामंतबंधूंना भेटल्या

गुहागरच्या ६ नगरसेविका भेटल्या सामंतबंधूंना

दीपक कनगुटकरही हजर ; वेगवेगळ्या चर्चांना चालना

गुहागर, ता. २३ ः गुहागर नगरपंचायतीमधील ६ नगरसेविकांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत यांची भेट घेतली. या वेळी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचे नेमके कारण काय? याची चर्चा सध्या सुरू आहे.
गुहागर नगरपंचायतीमधील बांधकाम सभापती वैशाली मालप, स्नेहा सांगळे, मनाली सांगळे या तीन शहरविकास आघाडीच्या नगरसेविका, भाजपच्या भाग्यलक्ष्मी कानडे, मृणाल गोयथळे आणि नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला आघाडीप्रमुख स्नेहा भागडे या मंगळवारी (ता. २१ फेब्रुवारीला) शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासमवेत रत्नागिरीत गेल्या होत्या. तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर शिर्के हायस्कूलजवळील सामंत कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात जाऊन त्यांनी भैय्या सामंत यांचीही भेट घेतली. या भेटीबाबत विचारणा केली असता पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागर नगरपंचायतीला २ कोटींचा निधी दिला त्यामुळे धन्यवाद देण्यासाठी मंत्री सामंत यांची भेट घेतली. विकासनिधी मागायला गेलो होतो. सदिच्छा भेट होती, अशी विविध कारणे सांगण्यात आली; मात्र भैय्या सामंत यांच्या भेटीबाबत काहीशी गुप्तताच बाळगण्यात आली होती.
गुहागर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे दोन महिने आहेत. अशावेळी गुहागरच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुहागर शहराचा पुढील दोन महिन्यात झपाट्याने विकास होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भैया सामंत आणि प्रवेश
शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची उपस्थिती आणि भैय्या सामंत यांच्या भेटीमुळे शहरविकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेविकांना शिवसेनेत घेण्यासाठी हा दौरा असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील अनेक मंडळी भेटतात; पण गेल्या काही महिन्यात भैया सामंत याची भेट म्हणजे शिंदे गटात प्रवेश अशी ओळख झाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर शहरातील बळ वाढवण्यासाठी तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com