
शिवचरित्रकार डॉ. शेटेंचे राजवाड्यात उद्या व्याख्यान
शिवचरित्रकार डॉ. शेटेंचे
राजवाड्यात उद्या व्याख्यान
सावंतवाडीत ‘सिंधुमित्र’तर्फे आयोजन
सावंतवाडी, ता. २४ ः येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी (ता.२६) सायंकाळी सहाला येथील राजवाड्यात ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’, या शिव व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे हे महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा मांडणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तोरणा, राजगड, रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, विशालगड, सिंधुदुर्ग यासह जिंजी पावेतो कित्येक गड व किल्ले यांचा समावेश आहे. गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेत प्रतापगडाचे महत्व काकणभर सरसच असुन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात महाराजांनी या गडावर अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. लोखंडी पहारही वाकवण्याची ताकद असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजल खानाचा पराभवही महाराजांनी याच गडावर धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर केला. हीच अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा या व्याख्यानातून मांडली जाणार आहे. त्यामुळे इतिहासातील ‘सर्वोत्कृष्ट युद्ध’ असे बिरुद असलेल्या या रणसंग्रामातील बारकावे ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी आहे. डॉ. शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास महाविद्यालयीन जीवनापासून आजतागायत सुरूच आहे. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी जुलैत पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर दोन मोहिमा आयोजित केल्या जात असुन यात हजारो शिवभक्त सहभागी होतात.