खानलोशीत एमआयडीसीसाठी
जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

खानलोशीत एमआयडीसीसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

खानलोशीत एमआयडीसीसाठी
जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
श्रीवर्धन : दिघी पोर्टपासून १३ किलोमीटरवर असलेल्या म्हसळा तालुक्यातील खानलोशी येथे औद्योगिक क्षेत्रात आयात-निर्यातवर आधारित उद्योग उभारण्यासाठी एमआयडीसीने मार्च २०२२ मध्ये स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. निविदा प्रसिद्ध करतेवेळी एमआयडीसीने खानलोशीचे भूसंपादन केले नव्हते. याशिवाय, प्रत्यक्षात स्थानिकांना विचारात न घेता ही प्रक्रिया सुरू केल्याने एमआयडीसीविरोधात सूर उमटत आहेत. एमआयडीसी म्हटले की, जमीन संपादित करून त्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, मलनि:सारण अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. खानलोशी येथे जमीन ताब्यात नसतानाही स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. शिवाय, जमीन व पायाभूत सुविधा नसल्याने एकाही उद्योजकाने येथे उद्योग उभारणीत रस दाखवलेला नाही. एमआयडीसी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी भूसंपादनासाठी क्षेत्र निश्चित करून शासकीय धोरणानुसार त्यासाठी आवश्यक निधी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे सुपूर्द केला होता. श्रीवर्धन उपविभागीय अधिकाऱ्यांनी अथवा तेथील महसुली प्रशासनाने खानलोशी एमआयडीसीसाठी अधोरेखित केलेले क्षेत्र व त्यांचे गट नंबर यांची यादी महसूल कार्यालयातील फलकावर लावलेली नाही. प्रस्तावित एमआयडीसीचे फलकही परिसरात नाही.
---
‘जलजीवन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची’
अलिबाग : प्रत्येक घरात नळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात तब्बल ९१३ कोटी ३८ लाख रुपयांच्या १४०५ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहेत; परंतु या योजना राबवताना मोठ्या प्रमाणात अनियमितपणा झालेला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कोणताच परिणाम होणार नसल्याची शक्यता व्यक्त करत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे चौकशीची मागणी केली आहे. आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावीत, यासाठी ई-निविदा प्रक्रिया सर्वसामान्यांपासून लपवण्यात आली होती. २० डिसेंबर २०१८ व १ डिसेंबर २०१६ च्या सरकारी निर्णयातील तरतुदीनुसार ई-निविदा जरी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी त्याची माहिती जास्तीत जास्त नागरिक व निविदाधारकांपर्यंत पोहचवण्यासाठी संक्षिप्त स्वरूपात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता न राबवल्याने अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही टंचाईग्रस्त नागरिकांना याचा फायदा होणार नसल्याने जिल्हा परिषदेच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तीन वर्षांत पाणीपुरवठा योजनांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६१ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. असे असताना पुन्हा निकृष्ट दर्जाच्या योजना येथील नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे अधिकारी करत आहेत. या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी संजय सावंत यांनी केली आहे.
---
सावरगावच्या रस्त्यावर धुळीचे राज्य
नेरळ : अनेक वर्षांनंतर १० लाखांचा निधी मिळूनही कर्जत तालुक्यातील सावरगाव येथील रस्ता तीन महिन्यांतच पार धुवून गेला आहे. या रस्त्यामधील सिमेंटने रस्त्याची साथ सोडली असून, त्याची धूळ होऊन आता नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. काही महिन्यांतच नवीन रस्त्याची धूळदाण झाल्यामुळे संबंधित ठेकेदारावर नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सावरगाव हे गाव वसलेले आहे. किरवली ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या या गावासाठी डोंगरी विकास कार्यक्रमातून रस्त्यासाठी तब्बल १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. गावाच्या आणि पर्यायाने गावकऱ्यांच्या विकासाचा मार्ग म्हणून सावरगाव रस्त्याकडे पाहिले जाते. गावातील रस्ते सुस्थितीत व्हावेत, यासाठी गावकरी आणि लोकप्रतिनिधी झटत असतात. मात्र, निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याची कामे ठेकेदार निकृष्ट दर्जाची करत असल्याने गावकऱ्यांच्या नशिबी पुन्हा खाचखळगेच येत आहेत. सावरगाव येथील रस्ता तयार होऊन तीन महिने उलटत नाही, तोच रस्त्याला धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सिमेंटची माती होऊन तीच आता रहिवाशांच्या डोळ्यात जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी आणि अशी ढिसाळ कामे करून नागरिकांच्या आणि सरकारच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
--
सातिर्जेत जलजीवनचा आधार
अलिबाग : तालुक्यातील सातिर्जे गावासह पाच पाड्यांतील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली जाणार आहे. या जलजीवन योजनेचा अधार सातिर्जेमधील दीड हजार नागरिकांना मिळणार आहे. रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने व सरपंच प्राजक्ता खडपे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या योजनेच्या कामाला सोमवारी सातिर्जेमध्ये सुरुवात झाली. सातिर्जे ग्रामपंचायत हद्दीत सातिर्जे, कातळपाडा, हुलणीचा पाडा, चिंबुलकरपाडा, प्रभुपाडा, बोंबटकरपाडा अशा एक गाव व पाच वाड्यांचा समावेश आहे. या गावांतील नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होतो; परंतु तोदेखील मुबलक प्रमाणात नसतो. मे महिन्यात गावांतील दोन विहिरीमधील पाण्याची पातळी कमी झाल्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. भोईर यांच्या पुढाकाराने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे ८१ लाख ४४ हजार ९८९ रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे प्रत्येक घरात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
---
हिरवी मिरचीचा ठसका
वाशी ः एपीएमसी बाजारात हिरवी मिरचीची आवक कमी होत असल्याने हिरव्या मिरचीने घाऊकमध्ये चाळिशी पार केली आहे. एपीएमसी बाजारात सुरुवातीला दर आटोक्यात होते; मात्र आता दरात वाढ होत आहे. याआधी घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० रुपयांवर उपलब्ध असलेली मिरची आता ४०-४६ रुपयांवर पोहोचली आहे. १० ते १५ रुपयांनी भाव वधारले आहेत. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची दाखल होत असते. सध्या बाजारात २०३९ क्विंटल मिरची दाखल होत आहे. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. दुसरीकडे सर्व भाजीपाल्यात भाव खाणारी भेंडी आता स्वस्त झाली आहे. त्याचबरोबर वांगी आणि शिमला मिरचीचे दरही कमी झाले आहेत. बाजारात भेंडीची १२०१ क्विंटल आवक असून प्रतिकिलो ४० रुपयांवरून आता ३४ रुपयांनी उपलब्ध आहे.
--
महाविद्यालयातर्फे मोफत नेत्र चिकित्सा
मुरूड : अंजुमन हायस्कुल पंचक्रोशी यशवंतनगर येथे अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरूड-जंजिरा व आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बुधवारी (ता. २२) घेण्यात आले. या शिबिरात नेत्रचिकित्सा करण्यासाठी प्रकाश पाटील, क्रिजन पशजुली, अश्विनी पाटील, अवंतिका रिकामे, नेत्रा होडपे, कल्पेश सावंत, अमर पोकळे व सपना शर्मा शंकर आय हॉस्पिटलमार्फत तपासणीसाठी उपस्थित होते. शिबिरादरम्यान २५० जणांची मोफत नेत्रतपासणी करून जवळजवळ ५० जणांना अल्प दरात चष्मेही उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, या शिबिरात २५ गरजू मोतीबिंदूग्रस्तांचे मोफत शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे अध्यक्ष जैनुद्दीन कादिरी व प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
---
हमरापूरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
पेण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेण तालुक्यातील हमरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरपंच राकेश दाभाडे, उपसरपंच संजय पाटील, सदस्य युवराज म्हात्रे, राजेंद्र शेदवळ, ओमकार पाटील, सदस्या पूजा पाटील, पायल सुर्वे, सायली मांडलेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठोबा पाटील, शिक्षिका पल्लवी भोईर, अपर्णा बंद्री, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी हमरापूर व खारसापोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com