माणगावमध्ये कडधान्य पिकांचा बहर

माणगावमध्ये कडधान्य पिकांचा बहर

माणगावमध्ये कडधान्य पिकांचा बहर
माणगाव : यंदा योग्य हवामानामुळे कडधान्य शेती बहरून आली आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने रब्बी हंगामातील तयार झालेल्या कडधान्य पिकाच्या झोडणीला माणगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी सततच्या अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या कडधान्य शेतीला यावर्षी जानेवारीमधील योग्य हवामानाने तारले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कडधान्य शेती पूर्णतः तयार झाली आहे. माणगाव तालुक्यात ४५० ते ५०० हेक्‍टर शेतीवर कडधान्य शेती केली जाते. अनेक शेतकरी या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात. मूग, मटकी, वाल, हरभरा, तूर, चवळी इत्यादी कडधान्याची लागवड व उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गावाकडील शेतीतील कडधान्यांना शहरातही चांगली मागणी आहे. वाल, मटकी, घेवडा, मूग, हरभरे, चवळी इत्यादी कडधान्य पिकांचा बहर आला आहे. काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी या कडधान्य पिकाची काढणी करून झोडणीला सुरुवात केली आहे. कडक उन्हात कडधान्ये चांगली सुकून जातात व झोडणी करणे सोपे जाते. त्यामुळे या कामांना वेग आला आहे.
---
कामोठ्यात पाण्याअभावी झाडे सुकली
कामोठे : पनवेल महापालिका आणि सिडको यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कामोठ्यातील विरंगुळा केंद्र, उद्यानातील झाडे पाण्याच्या अभावामुळे सुकलेली आहेत. याशिवाय, सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने ती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पनवेल महापालिका आणि सिडको यांच्यातील मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. नागरी सुविधांबाबत महापालिका व सिडको एकमेकांकडे बोट दाखवत आहे. माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत; तसेच कामोठे कॉलनी फोरम यांनी सेक्टर ५, ९, २१, ३१, ३५, ३६ मधील उद्यानातील झाडे पाण्याविना सुकल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी विरंगुळा केंद्रामध्ये लावलेली झाडेही पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती भगत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे उद्यानातील खेळण्यांची दुरवस्थाही झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेसह सिडकोच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
---
‘महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणार’
रोहा : सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या मातीकाम साहित्याचा वापर योग्यरित्या करा, महिलांनी त्याला वेळ द्या. होतकरू महिलांना रोजगाराची संधी आवश्यकता असल्याने मातीकामातील वेगवेगळ्या कलाकृतीला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत माजीमंत्री तथा आमदार अदिती तटकरे यांनी व्यक्त केले. रोहा शहरातील दमखाडी येथे भारत सरकार, वस्त्र मंत्रालय व कार्यालय विकास आयुक्त हस्तशिल्प सेवा केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हस्तशिल्प कलेचा विकास व्हावा, या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने ५० दिवसांचा पॉटरी ट्रेनिंग वर्कशॉप घेण्यात आला होता. हा कोर्स येथील ३० महिलांनी पूर्ण केला. त्या महिलांना आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, इलेक्ट्रिक मातीचे चाक देण्यात आले. या वेळी रोहा माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, महेंद्र दिवेकर, काशिनाथ धाटावकर, माजी सभापती गीता पडवळ, उपअभियंता आशीष तरडे, माती काम प्रशिक्षक मंजी चव्हाण, कुंभार समाज कोकण विभागीय अध्यक्ष महेश सायकर, प्रशिक्षक गौरव कायंगडे, दीपक नागोठणेकर, शाम धाटावकर, संतोष खलापकर, भुपेंद्र धाटावकर, गिरीश घोसाळकर, मनोहर धाटावकर उपस्थित होते.
--
उधाणामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान
पेण : पेण तालुक्यातील बोरी, शिर्की, कोळवे, वाशी, सरेभाग परिसरातील हजारो एकर जमिनीत उधाणाचे खारे पाणी गेल्याने शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खारेपाटातील हजारो एकर जमिनीचे संरक्षण करण्‍यासाठी येथे बांधबंदिस्‍ती करण्यात आली आहे. तरीही उधाणाच्‍या पाण्‍याने ही बंदिस्ती फुटून खारे पाणी शेतात घुसल्याने वाशी, बोरी, कोळवे, शिर्की विभागातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खारे पाण्यामुळे शेती नापीक होत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
तालुक्‍यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांना उधाणाच्‍या पाण्‍याचा फटका नेहमीच बसत असतो. यावर प्रशासन कोणताच ठोस मार्ग अवलंबत नसल्यामुळे खारेपाट विभागातील शेतकरी उद्‍ध्वस्त होत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम शासकीय यंत्रणा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. शेतकरी आपल्या जमिनी मातीमोल दराने विकत असल्याने येथील शेती वाचवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
पाच महिन्यांनंतर सफाई कर्मचाऱ्यांना वेतन
श्रीवर्धन : तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सहा सफाई कर्मचाऱ्यांचे साधारण पाच महिन्यांचा पगार ठेकेदाराने अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अखेर सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेकडे मदत मागितली. युवासेनेच्या दणक्याने सर्वांचे थकीत पगार वितरित झाले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील सहा सफाई कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून पगार मिळाला नाही. हाती पैसा नसल्याने घर कसे चालवायचे, पोट कसे भरायचे अशी कैफियत या कर्मचाऱ्यांनी युवा सेनाकडे मांडली होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता युवा सेनेमार्फत स्वच्छता कंत्राटदार विक्रम उसगावकर आणि एम. एन. बैलमारे या ठेकेदाराकडे पाठपुरावा केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडेही कर्मचाऱ्यांना वेळेवर न मिळणाऱ्या पगाराबाबत विचारणा केली. सफाई कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली. डॉ. माने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा करण्यात येईल, असे सांगितले.
---
बसथांब्यावरील निवारा शेडचे नूतनीकरण
रसायनी ः वासांबे मोहोपाडा येथील नाक्यावर एचओसी कॉलनीच्या गेटजवळील एसटी बस थांब्यावरील निवारा शेडचे रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या वतीने नूतनीकरण करणाचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्‍घाटन प्रसंगी माजी सरपंच संदीप मुंढे, वासांबे मोहोपाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष अमित शाहा, सचिव डॉ. धीरज जैन, सहायक सचिव विजय पाटील, खजिनदार देवेंद्र महिंद्रकर, माजी अध्यक्ष गणेश काळे, सदस्य बाळकृष्ण होणावळे, रेश्मा कुरूप, टाकेदेवी तीनआसनी रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. एसटी बस थांब्यावरील निवारा शेडची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना उन्हा पावसात थांब्यावर थांबावे लागत होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com