विज्ञानविषयक वेगवेगळे उपक्रम आवश्यक

विज्ञानविषयक वेगवेगळे उपक्रम आवश्यक

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष......लोगो

भारतरत्न सर चंद्रशेखर वेंकटरामन यांचा '' रामन इफेक्ट ''हा जगप्रसिद्ध असलेला शोध निबंध २८ फेब्रुवारी १९२८ रोजी '' नेचर '' या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला. त्याबद्दल त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.सुप्रसिद्ध शाश्त्रज्ञ डॉ.वसंत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना,भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर सी.व्ही.रामन यांच्या शोधाच्या सन्मानासाठी २८ फेब्रुवारी हा दिवस १९८६ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत १९८७ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जात आहे त्या निमित्ताने...............

-जे. एम. पाटील, बॅ. नाथ पै. विद्यालय व जुनिअर कॉलेज, हर्चे
----------------------------------------

विज्ञानविषयक वेगवेगळे उपक्रम आवश्यक

राष्ट्रीय विज्ञान दिन हा दिवस भारतात शास्त्रीय, शैक्षणिक तांत्रिक व वैद्यकीय संशोधन संस्था, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मोठ्या आनंदाने साजरा करतात. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्यांना संशोधकांच्या कार्यातून संशोधनाबद्दल प्रेरित करणे, विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे. विज्ञानाच्या फायद्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, विज्ञानाचे महत्त्व लोकांना सांगणे, देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, विज्ञान व तंत्रज्ञान लोकप्रिय करणे, भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शालेय अभ्यासक्रम शिकविताना विज्ञानातील तत्वे, संशोधन यांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे. घटना व विज्ञान यांचा संबंध शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करायला हवे. शालेय जीवनात का? कसे?कोणी? कुठे? असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतील असे अनुभव प्रसंग निर्माण केले पाहिजेत. एक दिवस विज्ञान दिन साजरा करून वातावरण विज्ञानमय करून चालणार नाही तर वर्षभर विज्ञानविषयक वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजेत.
विज्ञान विषयावर तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे, विज्ञान प्रतिकृतींचे व विज्ञान खेळणी यांचे प्रदर्शन, पोस्टर निर्मिती प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा, निबंधलेखन, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, चर्चासत्रे, प्रयोगशाळेतील विज्ञान साहित्य मांडणी करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साहित्य ओळख करून देणे, विज्ञान प्रयोगांचे दिग्दर्शन करणे, विज्ञान ग्रंथ प्रदर्शन, विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी देणे, अंधश्रद्धेवर आधारित प्रयोग सादरीकरण, विज्ञान केंद्राला भेट देणे इत्यादी.
सी. व्ही. रामन उच्च शिक्षण घेऊन समुद्रमार्गे भारतात परत येत असताना आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचे का दिसते? अशा प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले. पाणी, बर्फ यांसारख्या पारदर्शक पदार्थमधून प्रकाशाचे विकिरण कसे होते यावर संशोधन सुरू केले. यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाचे उत्तर मिळाले. याविषयीचे संशोधन ''रामन इफेक्ट'' म्हणून ओळखले जाते. रमण वर्णपट हा जगाचे चित्र बदलणारा एक मोठा शोध आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्न विचारू, प्रयोग करू, तपासून पाहू, नवे काही तरी शोधू, प्रगती करू आणि शालेय विद्यार्थ्यांमधून भारतात एकच सी. व्ही. रमण नव्हे तर अनेक सी. व्ही. रमण निर्माण होतील अशी अपेक्षा करूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com