आठवडा बाजार नियोजनबद्ध स्थलांतर करा

आठवडा बाजार नियोजनबद्ध स्थलांतर करा

85675
सावंतवाडी ः पोलिसांना निवेदन देताना तालुका व्यापारी उद्योजक संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर. शेजारी पुंडलिक दळवी आदी.

आठवडा बाजार नियोजनबद्ध स्थलांतर करा

सावंतवाडी व्यापारी; मुख्याधिकाऱ्यांसह पोलिसांना निवेदन

सावंतवाडी, ता. २७ ः संत गाडगेबाबा भाजी मार्केट, गवत मंडईतील स्थानिक दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांनी आठवडा बाजाराचा योग्य नियोजनबध्द आराखडा आखून स्थलांतरित करावा, आठवडा बाजाराव्यतिरिक्त इतर दिवशी शहरात विनापरवानगी बसणाऱ्या बाहेरील व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सावंतवाडी तालुका व्यापारी उद्योग संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्यासह शिष्टमंडळाने येथील पोलिस अधिकारी व पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आणि व्यापारी पुंडलिक दळवी यांच्यासह शहरातील भाजी विक्रेते, किरकोळ व्यापारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडीत आठवडाबाजार मोती तलावाकाठी भरवला जातो; परंतु बाहेरील व्यापाऱ्यांमुळे स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला दिवसेंदिवस अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आठवडा बाजारादिवशी बाहेरील व्यापारी, भाजी विक्रेते व स्थानिक व्यापारी यांच्यात जागेवरून भांडणे, हाणामारीसारखे प्रकार रोज होताना दिसतात. यातील काही जण नशेत किंवा चक्कर आल्यामुळे तलावात पडतात. अशा घटना वारंवार घडत आहेत. वाहतूक व पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि स्थानिक व्यापारी यांनी एकत्र येऊन नियोजनबध्द आराखडा आखून आठवडा बाजार मोती तलाव काठाऐवजी इतर ठिकाणी स्थलांतरीत करावा. प्रत्येक व्यापाऱ्यास शिस्त लावावी. आठवडा बाजारानंतर बुधवार ते सोमवार दरम्यान येथील भाजीमार्केटमध्ये कुठच्याही प्रकारचा व्यापार होत नाही. बाहेरील भाजी विक्रेते, कपडे, फेरीवाले, प्लास्टीक विक्रेते व्यापारी मात्र आठवडा बाजाराव्यतिरिक्त शहरातील हॉटेल मॅंगो, शिरोडा नाका, सावंतवाडी एसटी बसस्थानक, इतर चौकाचौकात, सावंतवाडी सीमेलगत दुकाने थाटून वाहतुकीस अडथळा करतात. दुय्यम दर्जाचा माल विकून जनतेची फसवणूक करतात, असा आरोपही करण्यात आला आहे. पालिकेस कुठच्याही प्रकारचा कर न भरता व इतर परवाने न घेता राजरोसपणे दांडगाईने व्यापार करतात. यामुळे भाजीमार्केट परिसर, विक्रेते व दुकानदारांवर कर्जबाजारीसह उपासमारीची पाळी आली असून दरदिवशी करपावती, इतर परवाने आणि प्रशासनाच्या सर्व अटी नियम पाळूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांचा शहराच्या प्रत्येक सुखदुःखात, विकासात्मक कामांत वेळोवेळी सहभाग असतो; परंतु बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा सावंतवाडीला कोणताही फायदा नाही. याउलट त्यांच्याकडून हाणामाऱ्या, भांडणे करून सुसंस्कृत शहराची शांतता केली जाते. यामुळे सावंतवाडीच्या नावलौकिकास गालबोट लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
----------
चौकट
स्थानिकांना न्याय देण्याची मागणी
आठवडा बाजाराव्यतिरिक्त इतर दिवशी शहर परिसरात बसून व्यापार करणाऱ्या बाहेरील व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना बंद करावे; अन्यथा स्थानिक व्यापाऱ्यांना इतर सनदशीर मार्गाने उपोषण, आंदोलनाच्या मार्गाने दाद मागावी लागेल. यावर निर्णय होत नसेल तर आठवडा बाजार कायमस्वरुपी बंद करून स्थानिक व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com