
कोकण वाली
कृषी सदर
swt12.jpg
L86068
डॉ. विलास सावंत
कोकण वाली
वालीची लागवड विशेषतः कोकणात केली जाते. ‘कोकण वाली’ ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात चांगले उत्पादन देणारी असून चविष्ट आहे. कोकणात भात कापणीनंतर वालीची लागवड केली जाते. वालींमध्ये प्रथिने व जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. कोवळया शेंगांची भाजी, कोवळ्या पानांची भाजी अत्यंत पौष्टिक असते. पिकलेल्या शेंगांपासून मिळालेल्या दाण्यांची उसळ अत्यंत चविष्ट असते.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
...............
मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन वाली पिकाला उत्तम मानवते. खरीप हंगामात जिरायती व रब्बी-उन्हाळी हंगामात बागायती पीक घेता येते. जमिनीची चांगली नांगरट करून हेक्टरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून 3x3 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. त्यानंतर 60 सेंटीमीटर अंतरावर लहान खड्डे खोदून घ्यावेत. रासायनिक खतांचा पहिला हप्ता 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावा. खते मातीत चांगली मिसळावीत. उरलेले 60 किलो नत्र, 60 ते 85 दिवसांच्या अंतराने दोन वेळा विभागून झाडाच्या सभोवती बांगडी पध्दतीने द्यावे. सुरुवातीला पाण्याच्या पाळ्या हलक्या द्याव्यात. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 6 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
एक हेक्टर लागवडीसाठी 8 ते 10 किलो बियाणे लागते. कोकण वाली ही सुधारीत जात दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. रब्बी हंगामात पेरणीनंतर 80 ते 85 दिवसांनी शेंगांची तोडणी करता येते. शेंगांची लांबी 35 ते 40 सेंटीमीटर असते. या जातीपासून हेक्टरी 60 ते 70 क्विंटल उत्पादन मिळते. बियांची उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी रोपांची विरळणी करावी. प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवावे. हे वेल वर्गीय पीक असल्यामुळे रोपांना आधार द्यावा लागतो. खुरपणी करून वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे 6 ते 8 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी 1.5 मिलीलिटर डायमेथोएट एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक फुलोऱ्यात आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन 2 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिकामध्ये पिवळ्या आणि निळ्या चिकट कागदाच्या कार्डचा वापर करावा, ज्यामुळे मावा आणि फुलकिडीच्या प्रादुर्भावाला आळा बसेल. वालीच्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची तोडणी करावी. तोडणी दोन ते तीन दिवसांनी करावी. वालीचे हेक्टरी 60 ते 70 क्विंटल उत्पादन मिळते. कोकणातील शेतकऱ्यांनी या पिकाची व्यापारी तत्वावर लागवड करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मोठा वाव आहे.
..............