जिल्ह्यात ''मामाचा गाव'' संकल्पना रुजवणाऱ्या डी. के. सावंतांचे निधन

जिल्ह्यात ''मामाचा गाव'' संकल्पना रुजवणाऱ्या डी. के. सावंतांचे निधन

swt२११.jpg
86346
डी. के. सावंत

‘मामाचा गाव’ संकल्पना रुजवणाऱ्या सावंतांचे निधन
माजगाव घाटीत उभारलेला पर्यटन प्रकल्प लक्षवेधी; बांद्याचे सुपुत्र
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः पर्यटन प्रेमी आणि रेल्वे प्रवासी म्हणून सडेतोड भूमिका मांडत पर्यटन क्षेत्रात ‘डी. के. मामाचं गाव’ संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवणारे ध्रुवबाळ कृष्णा उर्फ डी. के. सावंत (६९) यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार आहे.
डी. के. सावंत हे ते मूळचे बांदा गावचे सुपुत्र असून माजगाव घाटी येथे त्यांनी साकारलेला पर्यटन प्रकल्प लक्षवेधी ठरला. बांद्याचे माजी सरपंच (कै.) कृष्णा सावंत पटेकर यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्या वडिलांचे बांदा जुना बसस्थानक नजीक हॉटेल व्यवसाय होता. त्यामुळे सावंत कुटुंब बांदा परिसरात सुपरिचित होते. बांदा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईत नोकरीसाठी गेले. तेथे सुरुवातीला एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करून आमदार निवासात कॅन्टीन चालविले. त्यांच्या पत्नी मंत्रालयात अधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते सिंधुदुर्गात स्थिरावले आणि जिल्ह्यात पर्यटनाची पायाभरणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतभर सहली आयोजित करून पर्यटन क्षेत्रात पाय रोवले. सावंतवाडीमध्ये येऊन पर्यटन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान डी. के. सावंत (द्वारका कृष्णा पर्यटन विकास) ही सहकारी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविले.
माजगाव येथील मळगाव घाटीच्या वरच्या भागात ''डी. के. टुरिझम'' हा अनोखा पर्यटन प्रकल्प साकारला. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कार्यपूर्तीचा ध्यास याच्या बळावर त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला. त्यानंतर ''डी. के. मामाचा गाव'' ही संकल्पना राबवून देशविदेशातील पर्यटकांना कोकणातील अस्सल ग्रामीण पर्यटन घडवून आणले. कोकण रेल्वेचे पहिल्या दिवशापासूनचे प्रवासी होते. रेल्वे प्रवासी प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना विविध सेवा मिळवून देण्यासाठी कार्यरत होते. त्यासाठी मुंबई, सावंतवाडी येथे आंदोलन केले. त्यांचा सडेतोड स्वभाव व भ्रष्टाचार विरोधातील लढा सर्वांनाच परिचित होता. पर्यटन क्षेत्रातील भ्रष्टाचार त्यांनी अनेक वेळा उघड केला होता. त्या विरोधात त्यांनी नेहमीच आपली परखड भूमिका वेळोवेळी मांडली.
प्रबळ इच्छाशक्ती ठेवून ते आजाराविरोधातही लढले. शेवटच्या श्वासापर्यंत रेल्वे प्रवासी, पर्यटन विकासासाठी ठाम भूमिका मांडली. ''मामाचं गाव'' संकल्पना शासनाने उचलून धरत पायाभूत सुविधांची निर्मिती केली असती, तर दाभिळ गाव पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू ठरला असता, असे मत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com