शुल्क अपहारप्रकरणी 
वरिष्ठ लिपिक ताब्यात

शुल्क अपहारप्रकरणी वरिष्ठ लिपिक ताब्यात

शुल्क अपहारप्रकरणी
वरिष्ठ लिपिक ताब्यात
वैद्यकीय महाविद्यालय; यवतमाळमध्ये कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी शुल्कामध्ये अपहार केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या तत्कालीन वरिष्ठ लिपिकाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर २५ जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कामाच्या ठिकाणाहून त्याला हेड कॉन्स्टेबल गुरुदास पडावे, कॉन्स्टेबल वैभव जाधव यांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अद्याप अटक केलेली नाही.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व अनामत रक्कम शासकीय खात्यावर जमा न करता वैयक्तिक खात्यावर तत्कालीन वरिष्ठ लिपिकाने जमा केल्याचा आरोप मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला होता. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. चौकशीत चार लाख ३२ हजार २५० रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल केली होती. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ लिपिकावर २५ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप अटकेची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह होते. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत देवरे यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल गुरुदास पडावे, कॉन्स्टेबल वैभव जाधव यांनी यवतमाळ जिल्ह्यात जात त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने दिलेल्या पत्त्यावरील मालमत्या विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे तो सध्या राहत असलेल्या ठिकाणी आणि त्याच्या सासुरवाडीत पोलिसांनी फिल्डिंग लावली होती.
त्यासाठी यवतमाळ पोलिसांची मदत पथकाने घेतली. वरिष्ठ लिपिकाला कामाच्या ठिकाणाहून ताब्यात घेत गुरुवारी (ता.२) रात्री सिंधुदुर्गात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com