करवाढविरोधी आंदोलन पेटणार

करवाढविरोधी आंदोलन पेटणार

86858
सावंतवाडी ः वाढीव कराविरोधात झालेल्या बैठकीत बबन साळगावकर, अण्णा केसरकर, रुपेश राऊल, पुंडलिक दळवी आदी.


करवाढविरोधी आंदोलन पेटणार

सावंतवाडीत सर्वपक्षीयांच्या बैठकीत निर्णय; आज ठरणार दिशा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शहरावर लादण्यात येणाऱ्या वाढीव पाणी व घरपट्टी विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनाची सुरुवात येथील केशवसुत कट्टयावरून करण्याचे ठरले. त्यासाठी उद्या (ता. ५) सायंकाळी सहाला बैठक घेऊन घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा की अन्य आंदोलन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.
ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक साळगावकर यांच्या कार्यालयात झाली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, ठाकरे गट तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, मनसेचे आशिष सुभेदार, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समीर वंजारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, संतोष तळवणेकर, जिकर मेमन, इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, रवी जाधव, समिरा खलिल, नंदू मोरजकर, अभय पंडित आदी उपस्थित होते.
यावेळी साळगावकर यांनी शासनाचे परिपत्रक असल्याने करवाढ केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु ते खोटे बोलत आहेत. नगरपालिका लहान असली तरी ती शासनाची असून तिचे सर्व अधिकार हे कौन्सिलला आहेत. त्यांनाच दर ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे करवाढ रद्द करण्यासाठी उद्या सायंकाळी केशवसुत कट्टा येथे बैठक बोलावून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. या जाहीर सभेत सर्वांनी आपली भूमिका मांडायची आहे. येताना पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन यावे, असे आवाहन केले.
अण्णा केसरकर म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी, पक्षीय राजकारणाची भीती नोकरशाहीला राहिली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे. मुख्याधिकारी शासन परिपत्रक नाचवत असून त्याचा अभ्यास करून पर्दाफाश केला पाहिजे. त्यानंतर आंदोलनाला दिशा मिळेल. सावंतवाडीकर म्हणून स्वाभिमानी वृत्तीने लढा देऊ. पालिकेवर प्रशासक असताना कर आकारणी चुकीचे आहे. डोंगरी भागात कर आकारणी करता येणार नाही. याविरोधात आंदोलन छेडणे गरजेचे आहे. आज महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. आंदोलन करा, सत्याग्रह उभारताना नागरिक आणि शहराला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.’’ रुपेश राऊळ यांनी, दंड बसेल म्हणून पाणीपट्टी आणि घरपट्टीत वाढ करणे गैर आहे. करवाढी विरोधात जनजागृती करून विरोध केला पाहिजे. या विरोधात आंदोलन करण्यासाठी ठाकरे गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी पालिकेवर प्रशासक असल्यामुळे अर्थसंकल्प वास्तववादी सादर केला नाही. हा मनमानी कारभार आहे. त्यामुळे पाणीपट्टी आणि घरपट्टी दरवाढीविरोधात आंदोलन हाच पर्याय असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे दळवी यांनी करवाढीला सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील प्रश्नांबाबतही आवाज उठविण्याची गरज व्यक्त केली.
.............
चौकट
दरवाढीविरोधात सर्वपक्षीयांची समिती
उद्याच्या बैठकीमध्ये आंदोलनाबाबत चर्चा करून दिशा ठरविली जाणार आहे. याबाबत जनजागृती करण्यासंदर्भात देखील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. याबाबत समिती स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन दोन व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आंदोलन करायचे की नाही, यासंदर्भातही उद्याच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यटनतज्ज्ञ डी. के. सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मोती तलाव काठावरील तुतारीच्या अवमानाबाबत निषेध नोंदवून चौकशीची मागणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com