
क्राईम पट्टा
rat०७४६.txt
बातमी क्र. ४६ (क्राईम पट्टा)
बेकायदेशीर मद्यसाठा प्रकरणी कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी आणि हातखंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु बाळगणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ६) दुपारी करण्यात आली. संतोष यशवंत मयेकर (वय ४८, रा. काळबादेवी मयेकरवाडी) आणि नीलेश जानु माईंगडे (वय ४५, रा. भोके माईंगडेवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील संतोष हा काळबादेवी येथील जंगली झुडपाच्या आडोशाला तर नीलेश हा हातखंबा येथील धाब्याच्या मागील बाजुला विक्रीसाठी गावठी दारु जवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
--
टेम्पोची बॅटरी अज्ञाताने लांबवली
रत्नागिरी : शहराजवळील एका कंपनीजवळ असलेल्या हार्डवेअर दुकानासमोरील टेम्पोची ४ हजार रुपयांची बॅटरी अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार १ मार्च रात्री ते २ मार्च सकाळी १० वाजण्याच्या कालावधीत घडला. याबाबत मनोहर बाबूराव गोर्ले (वय ५२, रा. मिरजोळे हनुमान नगर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गोर्ले यांनी आपल्या मालकीचा टेम्पो १ मार्च रात्री ८ वाजता दुकानासमोर लावुन ठेवला होता. त्या टेम्पोची ८० अॅम्पीअरची बॅटरी अज्ञाताने चोरुन नेली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
---
बेशुध्द तरुणाचा उपचारावेळी मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे बेशुध्द अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान ३ मार्चला मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहम्मद अल रहमान (वय ३५,गाव माहित नाही) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. २३ फेब्रुवारी रात्री ११ वाजता मोहम्मद हा हातखंबा तिठा येथे बेशुध्द अवस्थेत सापडले होते. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु असताना ३ मार्च त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
--
शिमग्याचे पोस्त मागणाऱ्या चौघांना चोप
रत्नागिरी : शिमग्याचे पोस्त म्हणून पाच हजार रुपये द्या, अशी मागणी करत फर्निचर विक्रेत्या दुकानदाराला मारहाण करणाऱ्या तरुणांना जमावाने चांगलाच चोप दिला. हा प्रकार सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कॉंग्रेस भवन परिसरात घडला. भर रस्त्यात हाणामारी सुरू झाल्यानंतर शिमगोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. याच दरम्यान पोलिस घटनास्थळी धावले आणि दुकानात घुसून धुडगूस घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले.
सोमवारी रात्री बारानंतर बारावाड्यांच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली. या शिमगोत्सवाची रंगत दोन दिवसांपासून रत्नागिरीत पहायला मिळत आहे. चाकरमानीदेखील शिमगोत्सवासाठी दाखल झाले आहेत. त्यातच तळीरामांनी शिमगोत्सवाच्या नावाखाली येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे पोस्त घेत आहेत. असा प्रकार शहरातील कॉंग्रेस भवन परिसरात घडला. मात्र पाच हजार रुपयांची पोस्त मागणं चौघा तरुणांना चांगलेच महागात पडले. दारूच्या नशेत धुंद होऊन ते एका फर्निचरच्या दुकानात शिरले. दुकानात गेल्यानंतर दोघेजण कोचावर बसले तर दोघेजण खुर्च्यांवर जाऊन बसले. गिऱ्हाईक आल्याचा समज झाल्याने दुकानमालक पुढे गेला असता शिमगा असल्यामुळे त्यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली. त्यावर पोस्त देण्यास नकार दिल्याने संशयितांनी दुकान मालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची सुरू झाली आणि चारही तरुणांनी दुकानमालकाची मान पकडून फर्निचर दुकानातील गोदरेजचे कपाट पाडून नुकसान केले. यावरच न थांबता एक तरूणाने देव्हारादेखील उडवून दिला. दुकानात हाणामारी सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील नागरिक दुकान मालकाला वाचवण्यासाठी पुढे धावले. त्यांनी चारही संशयितांना चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान कॉंग्रेस भवनच्या नाक्यावर हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिस घटनास्थळी धावले. पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे.
---
मारहाणप्रकरणी एकाला पाच हजाराचा दंड
रत्नागिरी ः तालुक्यातील गावखडी मोहल्ला येथे मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपयांचा दंड व एक वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या बंधपत्रावर न्यायालायने आरोपीला मुक्त केले. एजाज अब्दुल रज्जाक दर्वेश (वय ३८) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अॅड. विद्यानंद जोग यांनी काम पाहिले. पुर्णगड पोलिस ठाण्यातील तात्कालीन पोलिस हवालदार धुमासकर यांनी तपास करून एजाज याच्याविरुद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. एजाज याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पुर्णगड पोलिस ठाण्यातील हवालदार महेश मुरकर यांनी काम पाहिले.