आड दशावताराचा सूत्रधारः नायक

आड दशावताराचा सूत्रधारः नायक

प्रवास दशावताराचा

swt914.jpg
87919
वैभव खानोलकर

swt915.jpg
87920
आड दशावतारात साथ संगत आणि नायकी.

आड दशावताराचा सूत्रधारः नायक

नायकांनू, पुढे येवन काय केलास? असा अस्सल मालवणी भाषेत प्रश्न संकासुर विचारतो; पण या खोचक प्रश्नाला मार्मिक उत्तर देत हा संवाद पुढे नेण्याचे कार्य करतो तो सूत्रधार. आड दशावताराचा संवाद खुलवणारे व रंगमंच व्यापणारे पात्र म्हणजे ''नाईक''.
- प्रा. वैभव खानोलकर
...............
मराठीतील नाईक शब्दाचा हिंदीत ''नायक'' असा उल्लेख होतो. ''नाईक'' हे आडनाव देखील आहे. नाईक हे आडनाव बहुतांशी राजपूत बंजारामध्ये असून त्यांच्या वसाहतीच्या प्रमुखाला नाईक (नायक) म्हणून ओळखले जाते. नाईक ही पदवी प्रतिष्ठेची मानली जाते. गाव, नगरीत नाईकाला मानाचे स्थान असते. पूर्वी सामाजिक, सांस्कृतिक कार्यात नाईकाला पहिला मान दिला जात असे आणि आजही ही प्राचीन परंपरा गोरराजपूत बंजारामध्ये कायम आहे.
तशीच पंरपरा आपल्या लाल मातीतील दशावतार लोककलेने जोपासलेली दिसते. रंगमंचावर आड दशावताराची सुरुवातीला नाईक आपल्या संगीत साथीदारांसह रंगमंचावर येतो. आड दशावतारात पारंपरिकता जपताना बहुतेक नाट्यमंडळात हार्मोनियम वाद्य वाजवले जात नाही. साथ संगतीत केवळ झांज आणि मृदंग वा पखवाज यावर आड दशावताराला रंग चढतो. यात मृदंग वादक किंवा झांज वादक यापैकी एक जण ही नायकी म्हणजे सूत्रधार म्हणून काम करतो. सूत्रधार हा खरा आड दशावतारातील पात्रांना बोलते करण्याचे काम करत असतो. मृदंगाचा नाद संभाळत किंवा झांजीचा ठेका धरत ब्राह्मण, ‌संकासुर, महाविष्णू यांच्या संवादातून प्रसंग निर्माण करत विनोदाला आवश्यक आणि पोषक वातावरण निर्मिती करणे, हे सूत्रधाराचे कौशल्य नक्कीच वाखणण्याजोगे असते.
नायकी करताना प्रत्येक सूत्रधाराची सादरीकरण करण्याची पद्धत भिन्न असली, तरी त्यातील गाभा आणि आशय मात्र सारखाच दिसतो. कपाळावर भगवा गंध आणि गळ्यात आवश्यक असल्यास मफलर, डोक्यावर बहुतेकदा फरची टोपी आणि अंगावर कोट अशी साधारण वेशभूषा सूत्रधाराची असायची आणि आजही काही पारंपरिक मंडळांकडे ती बघायला मिळते. सूत्रधार आपल्या मंडळाची यशोगाथा मांडत आड दशावतार खुलवत पुढे नेत असतो. मालवणी आणि मराठी भाषेवर कमालीची पकड असणारे सूत्रधार आपल्या जुगलबंदीतून रसिकांना पोट दुखेपर्यंत हसवितात.
प्रत्येक शब्दागणिक होणारा विनोद हा मालवणी मुलखाची भाषा संपन्नता दाखवतोच; याबरोबरच वाचिक अभिनयाचा आविष्कारही सिध्द करतो. विनोदासाठी टायमिंगची अचूकता परिणामकारकरित्या साधणारे सूत्रधार हे धयकाल्यात रंग भरतात आणि आपली छाप जनमानसावर उमटवतात. जर हा विनोदी सोहळा अनुभवायचा असेल, तर नक्की भेट द्या धयकाल्याला.
.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com