राजीनामा देऊन निवडून या!

राजीनामा देऊन निवडून या!

88678
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ. शेजारी चंद्रकांत कासार व मायकल डिसोजा.


राजीनामा देऊन निवडून या!

रुपेश राऊळ यांचे केसरकरांना आव्हान; बाळासाहेबांबाबत अभ्यासाअंतीच बोला

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः शिवसैनिकांच्या बळावर दोनवेळा आमदार झालेल्या दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे येथील तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज दिले. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा प्रथम केसरकर यांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे. सतत ते भाषा बदलत असतात, त्यामुळे त्यांना भाषामंत्री केले असावे, असा टोलाही श्री. राऊळ यांनी लगावला.
शालेय शिक्षण केसरकर यांनी शिवसेनेच्या येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर श्री. राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा उपस्थित होते.
श्री. राऊळ म्हणाले, ‘‘सावंतवाडीमध्ये मिंदे गटाची सभा झाली. यावेळी गद्दारी करणाऱ्या मिंदे गटाला पन्नास खोके ही टीका झोंबत आहे. त्यामुळे केसरकर यांनी ठाकरे आणि शिवसेना नेत्यावर खोटे आरोप केले आहेत. सावंतवाडीतील जनतेने केसरकर वारंवार खोटे बोलण्यात माहिर असल्याचे ओळखले आहे. त्यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकत नाही. म्हणून त्यांना भाषा मंत्रीपद मिळाले आहे. त्यांना शिक्षण व भाषा मंत्री पद का दिले, हे लोकांना आता कळून चुकले आहे. ते क्षणाक्षणाला आपली भाषा बदलतात.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकरांनी शिवसेना आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम अभ्यास करावा. या कुटुंबाने महाराष्ट्राला किंवा देशाला काय दिले, हे समजून घ्यावे. सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना बांधणी केली. ३२ व्या वर्षी आदित्य ठाकरे नेतृत्व करत असतील तर त्याचे स्वागत करायचे सोडून केसरकर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबीयांचे रक्त आहे. त्यांनी वीसाव्या वर्षी देखील नेतृत्व सांभाळले असते तरी ते यशस्वी झाले असते.’’
श्री. राऊळ म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळेच केसरकर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना २०१४ ते १९ या कालावधीत नेतृत्व दिले. केसरकर मातोश्रीवर गेले तेव्हा त्यांना दरवाजापर्यंत सोडण्यासाठी उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी आल्या. आपले घरातले कसे त्यांना मानले. त्यांच्या विरोधात केसरकर ओकत आहेत. गांधी चौकातील सभेत उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना काय शब्द दिला होता हे त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यांनी संजय राऊत यांना राजीनामा द्या, म्हणून सांगण्यापेक्षा स्वतः राजीनामा द्यावा. खोके आणि बोके हे काय आहे ते केसरकर यांनी पहावे. पण, खोके घेतले नाही तर त्यांना झोंबते कशाला? केसरकर यांची निवडून येण्याची पात्रता नसल्याने आमदार नितेश राणे यांनी त्यांना अप्रत्यक्ष निवडून आणू, असे जाहीर केले आहे. येत्या २०२४ मध्ये निवडणुकीला उभे राहिले तर त्यांची जनता पाडाव करेल.’’
---------
चौकट
...तर लोक मागे लागतील
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनीही केसरकरांवर टिका केली. यापूर्वी गावागावात पैसे न देणारे केसरकर आता देणगी वाटप करत आहेत. ते पैसे कुठून आलेत, हे लोकांनी शोधले पाहिजेत. गद्दार केसरकर यांनी वारंवार शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका केली तर लोक त्यांच्या मागे लागतील, असे कासार यावेळी म्हणाले.
---------
चौकट
आता राणेंचा नंबर
मायकल डिसोजा म्हणाले, "केसरकर पोपटाच्या गोष्टी सांगायचे. ते केसरकर आता भाषा मंत्री झाल्याने शब्द बदलत आहेत. ते केव्हा तरी जिल्ह्यात पर्यटनासाठी येत आहेत. केसरकर यांना ज्यांनी साथ दिली, त्यांना त्यांनी संपवले आहे. ते करेक्ट कार्यक्रम करतात. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आता केसरकर यांना निवडून आणायची भाषा केली आहे. त्यामुळे राणे यांचा आता नंबर लागणार आहे. कणकवलीमध्ये आता सतीश सावंत यांना फायदा होईल, असे ते म्हणाले.
----------

88679
पुंडलिक दळवी

‘दीपकभाई पब्लिक सब
जानती है…!’ ः दळवी

केसरकरांनी आता विकासावर बोला

सावंतवाडी, ता. १२ ः ‘प्रॉपर्टी’ विकून शिवसेना वाढवली, असा दावा करणारे केसरकर यापूर्वी पाचशे, हजार रुपये वर्गणी देताना हजार वेळा विचार करायचे. मात्र, आता हजारो, लाखो रुपयांच्या वर्गणीची पाकिटे ते न मागताच पाठवून देत आहेत. ही जादू खोक्यांची की आता शिंदे सेना वाढविण्यासाठी त्यांनी पुन्हा ‘प्रॉपर्टी’ विकली? असा सवाल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे उपस्थित केला. भावनेच्या राजकारणाचे दिवस संपले आता विकासाच्या राजकारणावर बोला. तुमचा राजकीय विकास किती झाला आणि मतदारसंघाचा किती झाला, हे जनतेने पाहिले आहे, असे म्हणत ‘दीपकभाई पब्लिक सब जानती है…!’ असा टोलाही त्यांनी लगावला. याबाबत श्री. दळवी यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद केले आहे की, केसरकर म्हणतात पूर्वी मंत्रिमंडळात असताना पाच वर्षे स्वतःची प्रॉपर्टी विकून शिवसेना वाढविली. आम्ही देखील सार्वजनिक जीवनात अनेक वर्षांपासून काम करत आहोत. अनेक मंडळात, संघटनेत काम केले. केसरकर यांना अनेक वर्षापासून ओळखतो. कदाचित त्यांनी प्रॉपर्टी विकलीही असेल. पण, पूर्वी पाचशे, हजार रुपये वर्गणी देताना हजार वेळा विचार करणारे केसरकर आता मात्र हजारो, लाखो रुपयांच्या वर्गणीची पाकिटे न मागता पाठवून देत आहेत. ही जादू झाली कशी ? शिंदे सेना वाढविण्यासाठी केसरकर खोक्यातून आलेले पैसे वाटत आहेत, की आता पुन्हा त्यांनी स्वतःची एखादी प्रॉपर्टी विकली हे देखील त्यांनी जाहीर करावे, असा सवाल त्यांनी केला. दीपकभाई, पब्लिक सब जानती है ! भावनेच्या राजकारणाचे दिवस संपले. आता विकासाच्या राजकारणावर बोला. तुमचा राजकिय विकास किती झाला आणि मतदारसंघाचा विकास किती झाला हे जनता पाहते आहे. त्यामुळे एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही लोकांना फसवू शकता. नेहमी-नेहमी नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
---------
चौकट
घारे-परब आश्वासक नेतृत्व
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला आता अर्चना घारे-परब यांच्या रूपाने नवीन कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे. महिला असूनही त्या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचत आहेत. अत्यंत तळमळीने लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. महिला विश्वासाने त्यांच्याकडे आपली गार्‍हाणी घेऊन येत आहेत. विद्यार्थी, युवक त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणुन पाहत आहेत. आणि हेच केसरकर यांचे मुख्य दुखणे आहे. त्यामुळे त्यांच्या जे पोटात होते ते वर्षभरानंतर आता कालच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांच्या ओठावर आले आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com