मुंबई-गोवा महामार्ग वर्षअखेर पूर्णत्‍वास

मुंबई-गोवा महामार्ग वर्षअखेर पूर्णत्‍वास

89215
कणकवली : महामार्गावरील वागदे येथील अपूर्ण बांधकाम झालेल्‍या मार्गिकेचे दोन दिवसांत डांबरीकरण होणार आहे.


मुंबई-गोवा महामार्ग वर्षअखेर पूर्णत्‍वास

चौपदरीकरणाला वेग; सिंधुदुर्गातील रखडलेली कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्‍न

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ : गेली बारा वर्षे रखडलेले मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेर पूर्णत्‍वाची शक्‍यता आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवा रस्ते व इतर प्रलंबित कामे मेपर्यंत पूर्णत्‍वाचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. महामार्ग चौपदरीकरणामध्ये सध्यस्थितीत झाराप ते वाकेडपर्यंतचे काम ९९ टक्‍के पूर्ण झाले आहे. तर वाकेड ते आरवली या टप्प्याचे काम केवळ २५ टक्‍के पूर्ण झाले आहे. उर्वरित आरवली ते इंदापूर दरम्‍यानचे काम सरासरी ६० ते ७० टक्‍केपर्यंत पूर्ण झाले आहे.
चौपदरीकरणाचा ठेका घेऊन देखील कामे पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांऐवजी दुसऱ्या कंपन्यांना ठेका देऊन चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय महामार्ग विभागाने घेतला. त्‍यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती आली आहे. सिंधुदुर्गातील झाराप ते खारेपाटण या हद्दीपर्यंत ९९.९९ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर वागदे येथील दीडशे मीटरचा रस्ता, कासार्डे येथील पन्नास मीटरचा रस्ता, नांदगाव आणि ओटव फाटा येथील सेवा रस्ते ही कामे भूसंपादनाअभावी खोळंबली आहेत. यातील वागदे येथील रखडलेले चौपदरीकरणाचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. तर ओटव आणि नांदगाव येथील सेवा रस्त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया मे अखेर पूर्ण करून सिंधुदुर्गातील चौपदरीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्‍याची माहिती महामार्ग विभागातर्फे देण्यात आली.
..............
चौकट
वाकेड ते आरवली कामाचा ठेका बदलला
चौपदरीकरणातील ११ टप्प्यांपैकी आठव्या टप्प्यातील वाकेड ते कांटे या टप्प्याचे केवळ २५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर कांटे ते आरवली या टप्प्याचे केवळ २२ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही ठिकाणी असलेल्‍या एमपीई कंपनीकडून कामाचा ठेका काढून घेण्यात आला. हे काम आता रोडवेज इन्फ्रा सोल्‍युशन या कंपनीला देण्यात आले असून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे.
..............
चौकट
कशेडी बोगदा मेमध्ये खुला
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येथे दोन बोगद्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातील एका बाजूच्या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होऊन येत्या मेपासून वाहतूक खुली होणार आहे. तर परशुराम घाटातील ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
----------------
कोट
येत्‍या पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणाची बहुतांश कामे मार्गी लागतील. तर पावसाळ्यातही महामार्गावरील प्रवास निर्धोक व्हावा, यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. यात तातडीने रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार एजन्सीवर कारवाई केली जाणार आहे.
- यशवंत घोटकर, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
--------------
चौपदरीकरण टप्पानिहाय काम (टक्केवारीत)
पनवेल इंदापूर ः ७५
इंदापूर ते वडपाले ः ४८.९३
वडपाले ते भोगाव ः ९१.५८
भोगाव ते कशेडी ः ७९.८६
कशेडी ते परशुराम घाट ः ९०.६०
परशुराम घाट ते आरवली ः ७६.३७
अारवली ते कांटे ः २२.७४
कांटे ते वाकेड ः २५.९६
वाकेड ते तळगाव ः ९८.२५
तळगाव ते कलमठ ः ९९.२३
कलमठ ते झाराप ः ९९.९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com