
बांद्यात रविवारी महाआरोग्य शिबिर
89280
बांदा ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना बांदा रोटरीचे अध्यक्ष मंदार कल्याणकर. शेजारी इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यात रविवारी महाआरोग्य शिबिर
मंदार कल्याणकर; विविध व्याधींवर आयुर्वेदिक उपचारांसह मार्गदर्शन
बांदा, ता. १५ ः अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बांदा रोटरीचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर व किडनी विकार, अॅलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वात विकार, मूळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग तसेच अन्य जुनात विकार अशा अनेक रोगांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय प्रकृतीप्रमाणे आहार, विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे.
रुग्णांच्या प्राथमिक निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून १६ ते १८ मार्च या कालावधीत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत रक्त तपासणी सकाळी ९ ते ११ या वेळेत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या होणार असल्याने मुख्य आरोग्य शिबिरापूर्वी रुग्णांनी रक्त तपासणी शिबिराचाही लाभ घ्यावा. या शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनच्या अधिष्ठाता तथा स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुजाता कदम, चिकित्सक डॉ. प्रशांत ससाणे, पंचकर्म तज्ज्ञ डॉ. स्वप्नीत चौधरी, शरीर रचना तज्ज्ञ डॉ. थ्रीगीत के., शल्य चिकित्सक डॉ. फोरम जोशी, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉ. दीपा शिरोडकर, योगा थेरपिस्ट डॉ. मोहिनी मेती, औषध निर्माता भक्ती चव्हाण, परिचारिका प्रिया पेडणेकर, सिद्धेश आईर हे वैद्यकीय सेवा देणार आहेत.
बांदा येथील शिबिर झाल्यानंतर २६ मार्चला जिल्हा परिषद केंद्रशाळा सभागृह, इन्सुली व २ एप्रिलला नेतर्डे येथे हे मोफत शिबिर होणार आहे. या दोन्ही शिबिरांच्या दोन दिवस पूर्वी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदाच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी शिबिर होणार आहे. बांदा शिबिराच्या प्रमुखपदी आपा चिंदरकर, इन्सुली शिबिर प्रमुखपदी स्वागत नाटेकर, नेतर्डे शिबिर प्रमुखपदी आबा धारगळकर व प्रमोद कामत यांची नेमणूक केली आहे.
यावेळी उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, आपा चिंदरकर, दिलीप कोरगावकर, सुदन केसरकर, स्वागत नाटेकर, आबा धारगळकर, सिद्धेश पावसकर, शिवानंद भिडे, मनसुख पटेल, सुधीर शिरसाट, संजय शिरोडकर, अक्षय मयेकर, श्री. परुळेकर आदी उपस्थित होते.
.................
कोट
भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुष मंत्रालयाचे रुग्णालय असून गोवा व महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना या ठिकाणी केवळ १० रुपयांत उपचार मिळणार आहेत. या रुग्णालयाचा प्रचार व प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावा, यासाठी येथील ग्रामीण भागात रोटरीच्या माध्यमातून मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.
- मंदार कल्याणकर, अध्यक्ष, रोटरी क्लब, बांदा