सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नेमबाजीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नेमबाजीत यश
सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नेमबाजीत यश

सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नेमबाजीत यश

sakal_logo
By

सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नेमबाजीत यश
सिंधुदुर्ग ः नुकत्याच डेरवण (चिपळूण) येथे झालेल्या डेरवण युथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील पाच नेमबाजांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. ही स्पर्धा ओपन साईट पीपसाईट व एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारांत घेण्यात आली. यात आयुष पाटणकर (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) याने १० मीटर पिस्तूल प्रकारात १७ वर्षांखालील गटात ४०० पैकी ३७१ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावत यावर्षी पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. याच क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील गटात स्वामी समर्थ संजय बंगळे कुडाळ याने ३५६ गुणांसह रौप्य पदक मिळविले. १० मीटर पीपसाईट प्रकारात १७ वर्षांखालील गटात वैष्णवी भांगले (बांदा) हिने कांस्यपदक, खुशल सावंत (भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी) याने १४ वर्षांखालील गटात रौप्यपदक, परशुराम जाधव याने १० मीटर पिस्तूल प्रकारात सहभाग घेऊन चांगली कामगिरी केली.
----------------
खोटलेत गुरुवारी धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः खोटले येथील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव सोहळा गुरुवारी (ता. २३) होणार आहे. यानिमित्त पहाटे साडेपाच ते नऊ आरती, नित्योपासना, नामधारक सौ. व श्री. विजय परब यांचा हरिपाठ, नऊला अभिषेक, दहाला श्रींची महापूजा, दुपारी साडेबाराला महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी दोनला कुंकूमार्चन, तीन ते सहा महापालखी सोहळा होणार असून त्यामध्ये ढोलवादन, फुगडी नृत्य, चित्ररथ, दिंड्या कलापथकांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी सात ते दहा दरम्यान सुस्वर भजने व महाप्रसाद, दहाला देवेंद्र नाईक यांच्या चेंदवणकर दशावतार मंडळाचा ‘गौरी स्वयंवर’ नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा. देणगीदारांनी श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
-----------------
अणावला आज आरोग्य मेळावा
कुडाळ ः अणाव ग्रामपंचायतीतर्फे उद्या (ता. १९) महिलांसाठी आरोग्य मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये महिलांची आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. महिलांसाठी फनीगेम्स आयोजित केले आहे. विजेत्यांना पैठणी तसेच पारितोषिके देण्यात येणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन अणाव ग्रामपंचायतीने केले आहे. मेळावा सकाळी नऊला सुरू होईल.