
पर्यटनवृद्धीस प्रशासनाकडून सहकार्य
90711
विजयदुर्ग ः येथे पर्यटक विसावा केंद्राचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संदीप भुजबळ यांच्या हस्ते झाले.
पर्यटनवृद्धीस प्रशासनाकडून सहकार्य
संदीप भुजबळ; विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी विसावा केंद्र
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः स्थानिक पर्यटनवृद्धीसाठी आणि तालुक्यातील किल्ले विजयदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून पर्यटक विसावा केंद्र सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांच्या हस्ते झाले. पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशासन आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.
किल्ले विजयदुर्गला भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रेरणोत्सव समितीने पुढाकार घेत किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक विसावा केंद्र सुरू केले. याच्या उद्घाटनावेळी मंचावर सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकारी भुजबळ यांच्यासह विजयदुर्ग मेरीटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी रजनीकांत पाटील, विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भारत फारणे, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला प्रशासनाचे सहकार्य असेल. विजयदुर्ग पर्यटनाच्यादृष्टीने सर्वदूर पसरवून येथील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे समितीने ठेवलेले उद्धिष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगितले. श्री. फारणे यांनी विजयदुर्गच्या ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करताना येथील पर्यटन स्थळाचा आवर्जून उल्लेख केला. प्रेरणोत्सव समितीला सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. श्री. पाटील यांनी विजयदुर्गच्या स्थानिक पर्यटनवृध्दीसाठी आपण कायमच तत्पर आहोत, अशी ग्वाही दिली. श्री. गावकर यांनीही स्थानिक पर्यटनवाढीच्या अनुषंगाने उहापोह केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष देवधर यांनी केले. सूत्रसंचालन रविकांत राणे यांनी केले. प्रवीण तरवडकर यांनी आभार मानले. यावेळी मंगेश वेतकर, बॉनी नर्होना, दुर्गप्रेमी राजीव परुळेकर आदी उपस्थित होते.
................
चौकट
पर्यटकांसाठी ‘पे अॅन्ड पार्किंग’
पर्यटकांच्या सोयीसाठी आगामी काळात विजयदुर्ग येथे ‘पे अॅन्ड पार्किंग’ व्यवस्था सुरू होणार असल्याचे प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष परुळेकर यांनी यावेळी सांगितले.