
चिपळूण - सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडे कल
सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडे कल
चिपळुणातील चित्र ः गुढीपाडव्याला बाजारपेठेत गर्दी
चिपळूण, ता. २३ ः हिंदू वर्षातील पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीसाठी मंगळवारी गर्दी झाली होती. सोने खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, नव्याने घराची बुकिंग, दुचाकी-चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची दिवसभर लगबग सुरू होती. या निमित्ताने बाजारपेठेमध्ये उत्साह होता.
गुढीपाडवा हा सण चिपळूण शहरासह खेर्डी, सावर्डे, अलोरे, पोफळी या उपनगरांमध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. घरासमोर रांगोळ्या काढून आणि गुढ्या उभारून नागरिकांनी गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत केले. घरोघरी गुढीपाडव्याची चांगली तयारी दिसत होती. रांगोळ्यांनी घरासमोरचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. सकाळच्या वेळेस दारासमोर गुढी उभारून पूजा करण्यात आली. दुपारी गुढीला नैवेद्य दाखवण्यात आला. गुढीपाडव्याच्या मुहुर्ताला खरेदी करण्याचीही रित असल्याने शहरातील दुकानांत गर्दी दिसून येत होती. दुचाकी, चारचाकी वाहने तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अनेकांनी साधला. त्यामुळे रविवारी शहर व उपनगरातील वाहनांची शोरूम, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आता आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले असून सोने खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्याही लक्षणीय होती. ग्रामीण भागातील ग्राहक वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अंगठी, लॉकेट, बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देत होते.
----
कोट
मागील महिन्यापासून सोन्याचे भाव स्थिर आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांमध्ये दागिने खरेदीचा उत्साह जास्त आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नेकलेस, मंगळसूत्र, बांगड्या यांना मागणी जास्त होती तसेच हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याकडेसुद्धा ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.
- प्रफुल्ल इंदुलकर ज्वेलर्स, चिपळूण
-----------
चौकट
येथे झाली गुंतवणूक
- सोने दागिने व सुवर्ण नाणी
- दुचाकी व चारचाकी वाहने
- रिअल इस्टेट
- गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू