
राजापूर ः जुवे बेटाला रस्त्याने जोडण्याच्या हालचाली
फोटो ओळी
-rat२३p१८.jpg ःKOP२३L९०८३३ राजापूर ः प्रांताधिकारी वैशाली माने यांना निवेदन आणि शासन-प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनांची फाईल देताना महिला ग्रामस्थ.
-rat२३p१९.jpg ः KOP२३L९०८३४ जुवे बेटावर जाण्यासाठी अशा होडीतील धोकादायक प्रवास संपणार कधी?
--------
जुवे बेटाला रस्त्याने जोडण्याच्या हालचाली
प्रातांधिकाऱ्यांची भेट ; होडीचाच आधार, रुग्णांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः अर्जुना नदीच्या जैतापूर खाडीच्या मध्यभागी वसलेल्या आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या तालुक्यातील जुवे बेट गेल्या काही वर्षामध्ये उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. पर्यटनदृष्ट्या सर्वांगसुंदर असलेल्या या बेटावर नियमित जा-ये करण्यासाठी जुवेवासियांना गेल्या कित्येक वर्षापासून कायमस्वरूपी रस्त्याची प्रतीक्षा राहिलेली आहे. मात्र, रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचा जुवेवासियांचा लढा अद्यापही सुरू आहे. दरम्यान, प्रांताधिकारी वैशाली माने यांनी नुकतीच जुवेबेटाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी देवाचेगोठणे-राघववाडी मुख्य रस्ता ते गिरेचींचमार्गे जुवे खारभूमी बंधारापर्यंतचा संभाव्य पर्यायी रस्ता व्हावा अशी मागणी त्यांच्याकडे ग्रामस्थांनी केल्याची माहिती येथील ग्रामस्थ अनिल करंजे यांनी दिली.
याप्रसंगी माने यांनी संभाव्य मार्गाच्या अनुषंगाने पाहणीही केली. त्यामुळे कायमस्वरूपी रस्ता होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही संपर्कासाठी एकमेव पर्याय असलेल्या छोट्याशा होडीतील जुवेवासियांचा धोकादायक समुद्रप्रवास आता थांबणार का? याकडे लक्ष लागले आहे. शेकडो घरे अन् त्यातील लोकवस्ती असलेल्या आणि सुमारे ४५ हेक्टर क्षेत्रामध्ये वसलेल्या जुवे बेटाला चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. या ठिकाणी जा-ये करण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांना छोट्याशा होडीचा आधार घ्यावा लागतो. गेल्या कित्येक वर्षापासून जुवेवासियांचा हा होडीतील प्रवास आजही कायम सुरू आहे. शासन-प्रशासन दरबारी रस्त्याबाबतची सातत्याने निवेदन देऊनही जुवेवासियांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. याबाबतची बातमी ‘सकाळ’मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत प्रांताधिकारी माने यांनी नुकतीच जुवे बेटाला भेट दिली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधल्याची माहिती ग्रामस्थ करंजे यांनी दिली.
कोट
कायमस्वरूपी रस्त्यासाठी प्रांताधिकारी वैशाली माने आणि सहकार्यांनी जुवेबेटाला भेट दिली. या वेळी संपर्क अन् रहदारीच्यादृष्टीने देवाचेगोठणे-राघववाडी मुख्य रस्ता ते गिरेचींचमार्गे जुवे खारभूमी बंधारापर्यंतचा कायमस्वरूपी रस्ता व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रस्त्याबाबतच्या सर्वांगीण बाजू सविस्तरपणे सांगून या रस्त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी भूसंपादन करण्याचे ग्रामस्थांनी सूचित केले. ग्रामस्थांच्या मागणीला माने यांनीही सकारात्मक प्रतिसाद देताना संभाव्य मार्गाची पाहणीही केली. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही पाठपुरावा सुरू असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा आहे.
--अनिल करंजे, जुवे ग्रामस्थ