गुहागर ः चिपळूण-कऱ्हाड रेल्वेबाबात महिनाभरात बैठक

गुहागर ः चिपळूण-कऱ्हाड रेल्वेबाबात महिनाभरात बैठक

चिपळूण-कऱ्हाड रेल्वेबाबात महिनाभरात बैठक

मंत्री दादा भुसे ; केंद्राकडे पाठपुरावा सुरू, सुधारित अंदाजित रक्कम ३ हजार १९६ कोटी
गुहागर, ता. २३ ः चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग प्रकल्पासंदर्भात येत्या महिन्याभरात बैठक घेण्यात येईल. या प्रकल्पाची सुधारित अंदाजित रक्कम ३ हजार १९६ कोटी झाली आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने ८० टक्के भार उचलावा, असे रेल्वे मंत्रालयाने राज्य शासनाला कळवले. याबाबत आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली.
याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार शेखर निकम, आमदार योगेश सागर, आमदार डॉ. देवराव होणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, कऱ्हाड-चिपळूण नवीन रेल्वेलाईन प्रकल्पासाठी ७ मार्च २०१२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या वेळी या प्रकल्पाची किंमत ९२८.१० कोटी रुपये होती. राज्य शासनाची ५० टक्के हिश्श्याची रक्कम ४६४.०५ कोटी इतकी होती. केंद्राने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षांत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या उपक्रमात राज्य सरकारने मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड केली होती. कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्या दरम्यान प्रत्येकी २६ आणि ७४ टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने ८० टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळवले; मात्र कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारित अंदाजित रक्कम ३ हजार १९६ कोटी झाली आहे.
राज्यासमोरील परिस्थिती पाहता सम प्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली. यावर केंद्राकडून अद्याप काही कळवण्यात आलेले नाही.

वैभववाडी-कोल्हापूर मार्ग पिंकबुकमध्ये
महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कऱ्हाड-चिपळूण आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून, त्याचा समावेश पिंकबुकमध्ये करण्यात आला आहे. कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com