लोकसहभागातून वाचन संस्कृती वाढावी

लोकसहभागातून वाचन संस्कृती वाढावी

swt२७१८.jpg
९१७५६
कुडाळः ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव’ कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण. सोबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी.

लोकसहभागातून वाचन संस्कृती वाढावी
रवींद्र चव्हाणः कुडाळमध्ये ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोकसहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरू करा, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. पुढील वर्षीपासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन साजरा करण्यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कुडाळ येथे झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, के. मंजुलक्ष्मी, नगराध्यक्ष आफ्रिन करोल, जिल्हा परिषध मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माजी आमदार राजन तेली, संजय आंग्रे, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वती प्रतिमा, ग्रंथ पालखी आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १२८ ग्रंथालये हे जिल्ह्याचे वैभव आहे. कमी मानधनात देखील आपल्या आयुष्यातील मोलाचे क्षण या वाचन चळवळीत देणाऱ्यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. लोकांच्या सहभागातून ‘जलयुक्त शिवार’ हे अभियान ज्या पध्दतीने यशस्वी झाले, त्याच पध्दतीने नव्या पिढीसाठी वाचन चळवळ राबविण्यासाठी विचार आणि नियोजन व्हायला हवे. ग्रंथालयामध्ये तरुणाई कशी येईल, यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यासमोर कथा-कथनाच्या स्पर्धा व्हायला हव्यात. कानात शिरणाऱ्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्याची ताकद कथा-कथन सादरकर्त्यांमध्ये आणि काव्य सादरकर्त्यांमध्ये आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर व्हायला हवेत. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकांची उपलब्धता असायला हवी. देश महासत्तेकडे जात असताना पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होईल, अशी पुस्तके ग्रंथालयात हवीत. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथा आणि परंपरा तयार कराव्या लागतील. सीएसआर फंडामधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत अहवाल तयार करावा. मराठी पत्रकारितेचे आद्यजनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील जन्मगावी योग्य नागरी सुविधा द्याव्यात. ६ जानेवारीला होणारा पत्रकार दिन शासकीय यंत्रणेतून पुढील वर्षापासून सुरू करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद ठेवावी. जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने जे व्हायला हवे, ते एकमताने करा.’’
खासदार राऊत म्हणाले, ‘‘ शंभर - दीडशे वर्षे पूर्ण झालेली ग्रंथालये जिल्ह्यात आहेत. कोकणातील मुलांचे स्पर्धा परीक्षेतील यश पाहता आपले पूर्वज किती दूरदृष्टीवादी होते, हे दिसून येते. त्यांनी सुरू ठेवलेली ग्रंथालय चळवळ पुढच्या पिढीपर्यंत सर्वांना न्यायची आहे. या डिजिटल युगात लिखित साहित्याचे महत्त्व आजही कमी झाले नाही.’’
आमदार नाईक यांनी, आजची नवी सातत्याने समाजमाध्यमांवर सक्रिय असते. त्यांना पुन्हा नव्याने वाचनालयांच्या, ई-ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती चळवळीत आणणे गरजेचे असून ही चळवळ सर्वांनाच पुढे न्यायची आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘पुस्तक वाचनामुळे आम्ही घडलो. समाज माध्यमांमुळे पुस्तक वाचनातील एकाग्रता कमी चालली आहे. पुस्तक वाचनातून प्रगल्भता येते. सध्याच्या पिढीचा ई-बुक वाचनाकडे कल दिसतो. त्यासाठीच जिल्ह्यातील आठ ग्रंथालयांमध्ये ई-ग्रंथालय राबविण्यासाठी पालकमंत्र्यांनी आठ कोटी निधी दिला आहे. त्यामधून आवश्यक ती साधन सामग्री निर्माण केली जाईल. यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या मुलांसाठी त्याबरोबर वाचनाची आवड आणि जागृती करण्यासाठी ही ग्रंथालये उपयुक्त ठरतील.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी इन्स्टाग्राम, यूट्युबच्या सध्याच्या युगात वाचन परंपरा कमी होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. ज्ञान वाढविण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तक वाचनामुळेच आम्ही इथपर्यंत प्रवास केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्सफर्ड ग्रंथालयामध्ये सर्व पुस्तके वाचून काढली. असे व्यक्तिमत्च दुसरे होणार नाही, असे ते म्हणाले. कोमसापचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन हजारे यांनी प्रास्ताविक केले. अनंत वैद्य यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com