''मल्टिस्पेशालिटी'' सावंतवाडीतच होणार

''मल्टिस्पेशालिटी'' सावंतवाडीतच होणार

91814
सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटीसाठी उपजिल्हा रुग्णालय परिसरात सोमवारी जागेची पाहणी करताना दीपक केसरकर. शेजारी अनामिका चव्हाण.

''मल्टिस्पेशालिटी'' सावंतवाडीतच होणार
दीपक केसरकर ः जागेचा प्रश्न ८० टक्के सुटला
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न ८० टक्के सुटल्यात जमा आहे. तीन वर्षांच्या संघर्षानंतर या ठिकाणी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे. राहिलेला २० टक्के प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत राजघराण्याचा प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ सोडवण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या.
त्यानंतर केसरकर म्हणाले, ‘‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत राणीसाहेब शुभदादेवी भोसले व युवराज लखमराजे यांची मुंबईत सकारात्मक चर्चा झाली. त्यात राजघराण्याने दोन पर्याय दिले. जागेचा मोबदला देणे, तसेच संपूर्ण जागेपैकी रुग्णालयासाठी आवश्यक जागा विनामोबदला सोडून उर्वरित जागेवरील आरक्षण रद्द करून द्या, असे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात नेऊन मार्गी लावू. त्यामुळे गेल्या तीन वर्षांचा संघर्ष संपणार आहे. त्यासाठी राजकारण्याने सहकार्याची भूमिका दर्शविली आहे. मल्टिस्पेशालिटी उभारताना पार्किंग व्यवस्था कॉमन करून एका बाजूला रुग्णालय व दुसऱ्या बाजूला राजघराण्यासाठी जागा सोडली जाणार आहे. सद्यस्थितीत तहसीलदारांचा बंगला आहे, तो पूर्वी शल्यचिकित्सकांसाठी होता, तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महसूलमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर बांधकाम विभागाकडून जागेची मोजणी करून आवश्यक तो नकाशा राजघराण्याला सादर करण्यात येणार आहे.’’
केसरकर म्हणाले, ‘‘येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधे नसल्याची बाब माझ्या कानावर आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ औषधे उपलब्ध करून दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण माझे चांगले मित्र आहेत. त्यांनीसुद्धा या प्रश्नाकडे लक्ष घातल्याने मी त्यांचा आभारी आहे. राज्यातील सरकार गतिमान आहे. ते सर्वसामान्यांचे असल्याने जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आठवड्यातून एक दिवस मी जिल्ह्यात येणार आहे. यामध्ये सकाळच्या सत्रात सावंतवाडी मतदारसंघात व दुपारनंतर ओरोस येथील कार्यालयात उपस्थित राहणार आहे. विविध खात्यांमध्ये भरती सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात तब्बल तीस हजार रिक्त पदे भरली जाणार असून, त्यामुळे येथील तरुण वर्गाला नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com