राजापुरातील आरोग्य यंत्रणा आजारी

राजापुरातील आरोग्य यंत्रणा आजारी

92250

राजापुरातील आरोग्य यंत्रणा आजारी
७९ पदे रिक्त ; ग्रामीण भागात सर्दी, खोकला, तापाची साथ
राजापूर, ता. २९ः ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर असलेल्या विविध प्रकारच्या दोनशे पदांपैकी १२१ पदे भरलेली असून, तब्बल ७९ पदे रिक्त आहेत. वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलावाचा जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होऊन लोकांना विविध साथ-आजारांना सामोरे जावे लागत आहे. या साथ-रोगांना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून कंबर कसली जात असताना मात्र, विविध प्रकारच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्य विभागाचे ‘प्रशासकीय आरोग्य’ काहीसे ढासळण्याच्या स्थितीमध्ये आहे.
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागांतर्गंत ओणी, करक-कारवली, जवळेथर, केळवली, फुपेरे, कुंभवडे, जैतापूर, सोलगाव, धारतळे अशी तालुक्यामध्ये ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रासह तालुका कार्यालयामध्ये अशी मिळून विविध प्रकारची २०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२१ पदे भरलेली असून, उर्वरित ७९ पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त राहिली आहेत. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी ६, आरोग्यसेवक (पुरुष) आणि आरोग्यसेवक मलेरिया प्रत्येकी ११, लॅब टेक्निशियन ३, कनिष्ठ सहाय्यक ३, परिचर आठ, स्त्री परिचर पाच, सफाई कामगार सहा या पदांसह तालुका आरोग्य विभागातील एका पदाचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे तापसरी, खोकला यांसह अन्य विविध स्वरूपाच्या आजारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून कंबर कसली जात आहे. मात्र, मोठ्या संख्येने विविध स्वरूपाच्या रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्य विभागाला कामकाज करताना अन् लोकांना वैद्यकीय सोयीसुविधा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रिक्त असलेली विविध पदे शासनाने तातडीने भरावीत, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

चौकट
दृष्टिक्षेपातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे

पदाचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
औषध निर्माण अधिकारी ९ ३ ६
आरोग्यसेवक (पुरुष) २५ १४ ११
आरोग्यसेवक मलेरिया २२ ११ ११
लॅब टेक्निशियन ४ १ ३
कनिष्ठ सहाय्यक १० ७ ३
आरोग्यसेविका ५५ ३१ २४
परिचर १९ ११ ८
स्त्री परिचर ९ ४ ५
सफाई कामगार ९ ३ ६
आरोग्य सहाय्यक मलेरिया ६ ४ २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com