रत्नागिरी  जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका गॅसवर

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका गॅसवर

जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका गॅसवर
४० रुग्णवाहिकांसाठी केवळ १७ चालक ; सर्वसामान्यांचे हाल
रत्नागिरी, ता. २९ ः रिक्त पदांमुळे आधीच संकटात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला आता नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात मंजूर असलेल्या एकूण ४० रुग्णवाहिकांसाठी सध्या फक्त १७ वाहनचालक उपलब्ध आहेत. त्यामुळे गरजेवेळी रुग्णवाहिका उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी त्याच्या खिशाला चाट बसत आहे. रुग्णवाहिकांची सेवाच गॅसवर आहे, तर उपलब्ध चालकांची आपत्कालीन परिस्थितीत तारांबळ उडत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचा मोठा आधार आहे. सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू वर्गासाठीही मोफत आरोग्यसेवा देणारे मोठे केंद्र आहे; मात्र सध्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या केंद्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सर्व विभाग असूनही रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यात भरीस भर म्हणून आता रुग्णवाहिकेवरील चालकांच्या रिक्त पदांचा विषय ऐरणीवर आला आहे. गावागावातून तसेच शहरातील लोकांना मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा पुरवण्याचे काम रुग्णालयातील कर्मचारी करतात.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या ४० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत; परंतु रुग्णवाहिकांची सेवा पुरवण्यासाठी फक्त १७ वाहनचालक उपलब्ध आहेत. या वाहनचालकांना या रुग्णवाहिका चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापैकी काही रुग्णवाहिका तर अनेक दिवस चालवल्या न गेल्याने रुग्णालयातच धूळखात पडल्या आहेत. आता तर सर्वसामान्य नागरिकांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळणाऱ्या सुविधांची वाट न पाहता प्रसंगी पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागत आहे. रुग्णाच्या सेवेत तत्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेसाठीही जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पुरेसा कर्मचारीवर्गच नाही. सध्या उपलब्ध असलेल्या १७ पैकी १६ वाहनचालक कंत्राटी कर्मचारी आहेत. रुग्णालयाचा कर्मचारी म्हणून एकच वाहनचालक सध्या उपलब्ध आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनही हे कर्मचारी नियुक्त करण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णवाहिकांची सेवा आता गॅसवर आहे.
-------------------
कोट
नियुक्तीबाबत सूचना नाही
उपलब्ध रुग्णवाहिकांच्या प्रमाणात वाहनचालक सध्या उपलब्ध नसल्याबाबत आम्ही राज्य आरोग्य विभागाकडे कळवले आहे; मात्र अद्याप वाहनचालक नियुक्त करण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सध्या असलेले वाहनचालक आणि उपलब्ध रुग्णवाहिका या आलटून पालटून वापरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
-डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com