सदर ः सिद्धहस्त कवी भा. रा. तांबे

सदर ः सिद्धहस्त कवी भा. रा. तांबे

rat3112.txt

बातमी क्र..12 (टुडे पान 3 साठी)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो

फोटो ओळी
92605
प्रकाश देशपांडे
........

92604
कवी भा. रा. तांबे
--------------

सिद्धहस्त कवी भा. रा. तांबे

अठराव्या शतकात कोकणातून अनेक घराणी उत्तर भारतात जाऊन स्थिरावली. त्यांनी राजकारण, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवला. मराठ्यांचे प्रसिद्ध सरदार गोविंद पंत बुंदेले हे मूळचे खेरचे. त्यांनी अत्यंत पराक्रम गाजवून दिल्ली दरबारात आपले वजन प्राप्त केले होते. लांजा तालुक्यातील कोटच्या नेवाळकरांनी झाशी संस्थान निर्माण केले. कोटजवळच्या कोलधे गावातील तांबे घराण्यातील झाशीच्या राणीचा पराक्रम सर्वश्रुत आहे. राजापूर तालुक्यातील कोतवडे गावचे पराडकर घराणे उत्तरेत जाऊन पंत झाले. गोविंद वल्लभ पंत यांनी स्वतंत्र भारताचे गृहमंत्रिपद भूषविले होते.


हिंदी वृत्तपत्रसृष्टीतील ‘भीष्माचार्य’ बाबूराव पराडकर हे आपल्या कोकणातले. इंदूरचे प्रसिद्ध कवी भालचंद्र लोवलेकर. त्यांच्या अनेक कविता जुन्या पाठ्यपुस्तकांत होत्या. ते मूळचे संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचे. काव्यक्षेत्रात ज्यांनी आपली देदीप्यमान मुद्रा उमटवली ते कविश्रेष्ठ भा. रा. तांबे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील खेडकुळी जवळील कोंडवी गावचे. त्यांचे पूर्वज गोविंद पंत बुंदेल्यांबरोबर उत्तर हिंदुस्थानात गेले. बुंदेल खंडातील कुढोण गावाची जहागिरी तांबे घराण्याने कर्तृत्वाने मिळवली होती. कविवर्य भास्करराव तांब्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १८७४ ला मुंगावली येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. काही शिक्षण झाशीमध्येही झाले. झाशी इंग्रजांकडे गेल्यावर पुढील शिक्षणासाठी ते आजोळी देवास येथे गेले. लहान वयात त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथ अभ्यासले होते. तुळशीदासांचे हिंदी रामायण बरेचसे पाठ झाले होते. देवास येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. या काळात काशीनाथ भास्कर लेले या मास्तरांनी त्यांची इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यातील उपजत काव्य स्फुल्लिंग फुलविण्यासाठी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तकांचा अभ्यास करवून घेतला व साहित्यशास्त्राचे अध्ययन करून घेतले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण तांब्यांना घेता आले नाही. देवासचे राजपुत्र खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्या काळातही त्यांनी इंग्रजी व संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. काव्यलेखनाचा प्रारंभही याच सुमारास म्हणजे इ. स. १९०० च्या आसपास झाला. नोकरीच्या निमित्ताने देवास, इंदूर, गुदरखेडा अशा ठिकाणी राहावे लागले. साहित्य साधनेबरोबरच अनेक साहित्यिक मित्र भास्कररावांनी जोडले होते. या प्रारंभीच्या लेखनकाळात भा. रा. तांबे काव्यलेखनाचे विविध प्रयोग करत होते. शिशुगीते, एकोक्ती, द्वंद्वगीते, सुनीते, भावगीते असे अनेक प्रकार त्यांनी लिहिले; परंतु ते त्यांच्या स्वतःच्याच पसंतीला न उतरल्याने अनेक कविता त्यांनी नष्ट करून टाकल्या. त्यांना यशस्वी वाटलेली गीतेच त्यांनी शिल्लक ठेवली. एकंदरीतच तांबे आपल्या कवितांबाबत बेफिकीर असत. कवितेमध्ये परिष्करण करणे तर त्यांना मुळीच मान्य नव्हते. त्यांच्या कवितांचे मोल त्यांच्या रसिकमित्रांनी ओळखले. ग. गं. जांभेकरांनी त्यांच्या इकडेतिकडे विखुरलेल्या कविता एकत्र केल्या. ‘आनंद’कर्ते आपटे यांनी त्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. प्रा. वा. ग. मायदेव यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक भा. रा. तांबे यांच्या कवितांचा पहिला संग्रह इ. स. १९२० मध्ये प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील काव्यरसिकांना त्या कवितांनी मोह घातला. १९२६ ला ‘ज्ञानप्रकाश दैनिकाने’ महाराष्ट्रातील तत्कालीन ‘विद्यमान कवींत सर्वश्रेष्ठ कवी कोण?’ अशी स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत तांबे यांना प्रथम क्रमांक मिळाला.
तांबे यांच्या कवितांचा दुसरा संग्रह ‘अज्ञातवासी’ या कवींनी संपादित केला. त्याला साहित्यसम्राट न. चि. केळकर यांची प्रस्तावना लाभली. या दोन संग्रहांमुळे तांबे हे सौंदर्यवादी, आनंदयात्री, आशावादी, कवी म्हणून विख्यात झाले. पुढे डॉ. माधवराव पटवर्धन यांनी तांबे यांची समग्र कविता संपादित केली. त्यांच्या भावगीतांनी रसिकांना भुरळ पाडली. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण विलोभनीय प्रेमगीते, रमणीय शिशुगीते लोकांना आवडली. ‘डोळे हे जुलमी गडे’, ‘नववधू प्रिया मी बावरते’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ अशा कवितांनी रसिकमनाचा ठाव घेतला. ‘चिव चिव चिमणी छतात’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘गुराख्याचे गाणे’ अशी असंख्य गीते लोकप्रिय ठरली़. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘कळा ज्या लागल्या जीवा’ या तत्त्वज्ञानपर कवितांनीसुद्धा जनमानसात स्थान मिळवले. तांबे यांनी राष्ट्रीय, सामाजिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या कविता पारतंत्र्याच्या एका कालखंडात लिहिल्या. ‘रूद्रास आवाहन’, ‘उखळात दिले शिर काय आता?’, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘कोण रोधील?’ या त्यांपैकी काही कविता. सेवानिवृत्तीनंतर तांबे यांची ग्वाल्हेरचे राजकवी म्हणून नियुक्ती झाली.
तांबे यांची कविता भारतीय संस्कृतीच्या चिरंतन जीवनमूल्यांचा उद्‍घोष करते. स्त्री जातीबद्दलचा आदर, तिच्याविषयीची सहानुभूती त्यांच्या कवितांमधून प्रकटते. र्इश्वरविषयक आस्तिक्य बुद्धी, प्रेम, श्रद्धा यांमुळे त्यांच्या कवितेत एक प्रकारची शांत, संयत वृत्ती दिसून येते. तांबे संगीताचे उत्तम जाणकार होते, त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा कविता ‘गीत’ या संज्ञेला पात्र ठरतात. अनेक कविता कोणत्या रागात सादर कराव्यात, याचा त्यांनी सुरुवातीला निर्देश केलेला आहे. कवितेने शुद्ध कलावादी असावे. तिने समाजप्रबोधन वा उद्‍बोधन करण्याचा व्याप करू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. काव्यामधून क्रांती वगैरे करण्याचा अभिनिवेश त्यांनी कधीही धरला नाही.
तांबे रसपूर्ण भावगीते, नाट्यगीते लिहिणारे कवी होते तसेच ते काव्याचे व ललित कलांचे मर्मज्ञ टीकाकारही होते. साहित्यशास्त्राचे अभ्यासक होते. इ. स. १९३५ मध्ये ‘तांबे व्यक्ती आणि कला’ हा ग्रंथ त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने प्रसिद्ध झाला, तर त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी ‘तांबे साहित्यविचार’ हा ग्रंथ वा. रा. ढवळे आणि रा. अ. काळेले यांनी संपादित केला. या दोन्ही ग्रंथांमधून तांबे यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वावर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. त्यांच्या गद्यलेखनाचा विस्तृत आढावा अभ्यासकांना त्यातून मिळतो. मराठी कवितेची ध्वजा दूरवर फडकत ठेवणाऱ्या या सिद्धहस्त कवीला महाराष्ट्र रसिकांचा मानाचा मुजरा.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)
.................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com