भात उत्पादकांना २६ कोटी बोनस

भात उत्पादकांना २६ कोटी बोनस

भात उत्पादकांना २६ कोटी बोनस

अतुल काळसेकर; काजू बागायतदारांनाही हमीभाव मिळण्याची आशा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात विक्री केली होती. अशा ई- नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ५ हजार ६२२ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांप्रमाणे बोनस राज्याने जाहीर केला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण २६ कोटी २५ लाख ९० हजार रुपये जमा होतील, अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील काजू बागायतदारांनाही सरकारकडून दिलासा मिळणार असून काजूला हमीभावासह लवकरच बोंडापासून इथेनॉल निर्मित कारखानाही उभा राहील, असे श्री. काळसेकर यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत काळसेकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भात खरेदीचा दर अठरा रुपयापर्यंत होता. तेव्हा पाचशे रुपये बोनस पद्धत चालू झाली. आता शेतकऱ्यांना भातासाठी दोन हजार चाळीस असा समाधानकारक दर मिळत असून राज्य सरकार प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून भात विक्री केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. दोन हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त तीस हजार बोनसची मर्यादा आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ६२१ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.’’
श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘शेती कर्जातील प्रोत्साहन अनुदान दोन टप्प्यात वितरित झाले आहे. यादीतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही; पण, लवकरच ते वितरित केले जाईल. खावटी कर्ज माफीबाबत प्रयत्नशील असून बँकेने कर्जाची खाती पुनर्गठीत केली आहे; मात्र, २०१७ च्या यादीप्रमाणे खावटी कर्ज माफ व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे; पण, त्याबाबत अडचणी असल्या तरी सरकारशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बागायतदारांना यंदा काजूला दर मिळालेला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात १४० रुपयांचा दर आता शंभर रुपयांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काजू उत्पादकांना दिलासा निश्चितपणे दिला जाणार आहे. यापूर्वीप्रमाणे सेवा सोसायटी जर काजू खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली तर बँक ती देऊन काजू गाव पातळीवर खरेदी करता येणार आहे. काजूला जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काजूच्या खरेदीचा दर ठरविण्याची पूर्ण यंत्रणा ही खासगी तत्त्वावर आहे. त्यामुळे काजूला समाधानकारक दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे; परंतु, यालाही अनेक कारणे आहेत. गोवा राज्यांमध्ये गोवा बागायतदार संघ काजूची खरेदी करत असल्यामुळे तेथे दर स्थिर आहे. त्या तुलनेत आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक अडचणी आहेत.’’
------------
चौकट
१ लाख ६२२ क्विंटल भात खरेदी
यंदा जिल्ह्यात विविध केंद्रावर एक लाख ६२२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. यामध्ये थेटपणे सेवा केंद्रावर विक्री केलेल्या ५ हजार ५४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. काहींनी खासगी स्वरूपामध्ये ई- नोंदणी करून ही भात विक्री केली. केंद्र आणि राज्याच्या अनुदानातून अशा शेतकऱ्यांना २६ कोटी २५ लाख ९० हजार रुपये इतका बोनस जमा होणार आहे.
------------
चौकट
बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही चुका असल्यास अशा शेतकऱ्यांनी जवळच्या जिल्हा बँक शाखेमध्ये जाऊन खातर जमा करावी किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. काळसेकर यांनी केले.
--------
चौकट
इथेनॉल कारखाना उभारणार
काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या खरेदी विक्रीच्या दराची झळ बसत आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये काजूचे दर कशा पद्धतीने आहे, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. यापुढे काजू बोंडूपासून इथेनॉल निर्मिती व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात लवकरच इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारावा, अशी मागणी श्री. फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचे कामही सुरू असल्याचे श्री. काळसेकर यांनी सांगितले.
--
कोट
92630
रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा दीडपटीने भाताची विक्री आपल्या जिल्ह्यात झाली आहे. पणन खात्यामार्फत ही धान खरेदी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
- अतुल काळसेकर, उपाध्यक्ष, जिल्हा बँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com