विकासाबाबत जनतेची दिशाभूल नको

विकासाबाबत जनतेची दिशाभूल नको

94492
दोडामार्ग ः पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, अंकुश जाधव, प्रकाश गवस, चंदू मळीक आदी. (छायाचित्र ः संदेश देसाई)


विकासाबाबत जनतेची दिशाभूल नको

राजन तेली; मंत्री दीपक केसरकरांवर अप्रत्यक्षपणे टीका


दोडामार्ग, ता. ८ ः कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्याने भरघोस निधी दिला आहे. तर राज्याच्या अर्थसंकल्पातून कोट्यवधीच्या निधीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी प्रथमच तीन हजार कोटीच्या निधीची गंगा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारकडून वाहत आहे. इतिहासात असा निधी केव्हाच मिळाला नव्हता. ही किमया या सरकारने करून दाखविली आहे. पालकमंत्र्यांच्या शिक्कामोर्तबानंतरच विकासकामे मंजूर होतात. त्यामुळे आपण विकासाची परंपरा चालवतो आहोत, असे म्हणणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नाव न घेता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली.
येथे स्नेह रेसिडेन्सीमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांसह चंदू मळीक उपस्थित होते. तेली म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा महाजनसंपर्क अभियान यात्रा सुरू आहे. ७ एप्रिलपासून ही अभियान यात्रा दोडामार्गात सुरू असून आजचा शेवटचा दिवस आहे. राज्याच्या बजेटमधून कोकणासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी गावागावांत पोहोचला आहे. बजेट व योजनेची माहिती गावागावांतील सर्व बंधू-भगिनींना मिळावी, यासाठी माहिती पुस्तक वितरित केले जात आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जे बजेट सादर केले आहे, त्यामध्ये प्रथमच कोकणातील गावागावांत विकास निधी मोठ्या प्रमाणात पोहोचला आहे. पुस्तिकेद्वारे बजेटमधील विकासकामांचा आढावा महाविजय अभियान यात्रेद्दारे तळागाळात पोहोचविण्याचा मानस आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा सरकारने राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. महाराष्ट्रात काजूला हमीभाव दिलेला नाही. आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू शेती आहे. जगात दोडामार्गचा उच्च प्रतीचा काजू असून चविष्ट आहे; मात्र येथील काजूला म्हणावा तसा दर मिळत नाही. वर्षांनुवर्षे दराची घसरण होत आहे. परिणामी काजू लागवडीला खर्च अधिक व उत्पन्न कमी, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भार सोसवत नाही. काजू शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर वर्षाकाठी कुटुंब चालविण्याइतपत उत्पन्न देखील शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही. त्यामुळे येथील काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भेट घेऊन लक्ष वेधणार आहे. काजू बोंडू प्रक्रियेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केली आहे.’’
................
बॉक्स
तेलींनी मागितली हत्तीग्रस्तांची माफी
तिलारी खोऱ्यात २२ वर्षांपासून शेतकऱ्यांना उद्भवत असणारा हत्ती प्रश्न कायमचा निकाली काढण्यास आम्ही अकार्यक्षम ठरलो, हे मी मान्य करतो. शेतकऱ्यांचे गेल्या काही वर्षांत मोठे नुकसान झाले. बागबागायती उद्ध्वस्त झाली. हे थांबविण्यास आमचे सरकार कमी पडले. त्यामुळे सरकारच्या वतीने हत्तीग्रस्त शेतकऱ्यांची माफी मागतो, असे यावेळी तेली म्हणाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन हत्तीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com