नाभिक समाजाची एकजूट स्तुत्य

नाभिक समाजाची एकजूट स्तुत्य

९६८३३


नाभिक समाजाची एकजूट स्तुत्य
लाडू सुलकर ः मालवणात संत सेना जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : नाभिक समाजाची एकजूट आणि तळमळ कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात प्रथमच साजरा होणारा संत सेना महाराज जन्मोत्सव सोहळा आणि यानिमित्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान हे नाभिक समाजाचे एकीचे बळ आहे. गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने मला व माझ्या गोमंतकीय नाभिक समाज बांधवांना या एकजुटीचा निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन गोवा राज्याचे सचिव व माजी अध्यक्ष लाडू सुलकर यांनी येथे केले.
शहरात नाभिक समाजाची एकजूट आणि त्या एकजुटीने काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. भरड दत्तमंदिर येथून ढोलताशांच्या गजरात, दिंडी भजन आणि नाभिक समाजाचे श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने केलेल्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. यानिमित्ताने जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतील नाभिक समाज शहरात संघटित झाला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण आणि मालवण तालुकाध्यक्ष अॅड. भाऊ चव्हाण यांच्या टिमने ज्येष्ठ आणि तरुण यांचा मिलाफ करत नाभिक समाज बांधवांची एकजूट दाखवून दिली.
सकाळी साडेदहाला प्रदेश संघटक विजय चव्हाण यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव सहभागी झाले. शहराचा आठवडा बाजार असतानाही नाभिक समाज बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीमुळे वाहतुकीची कोंडी टाळत भरड येथून सुरू झालेली मिरवणूक दुपारी १२.३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. या मिरवणुकीत आचरा नाभिक समाज बांधवांची दिंडी भजन आकर्षण ठरले. नांदोस व कट्टा विभागाने श्री संत सेना महाराज, जिवा महाले, शिवा काशीद यांच्या भूमिका साकारून नाभिक बांधवांच्या शिवकालीन काळातील कार्याची साक्ष दिली. संत सेना महाराजांची पालखी बाजारपेठेतील नाभिक समाज बांधवांनी आकर्षक पद्धतीने सजविली होती. नाट्यगृहामध्ये महेश धामापूरकर यांनी श्री संत सेना महाराजांचा जीवनप्रवास उलगडणारे कीर्तन सादर केले.
व्यासपीठावर गोवा राज्याचे सचिव व माजी अध्यक्ष लाडू सुलकर, राज्य संघटक विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष अॅड. भाऊ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा दीपा शिंदे, कांता चव्हाण, संदीप चव्हाण, जगदीश चव्हाण, शुभम लाड, अंकुश चव्हाण, नीलेश चव्हाण, विजय चव्हाण, आनंद आचरेकर, बाळकृष्ण लाड, जगदीश वालावलकर, सुधीर चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण, गणेश चव्हाण, महेंद्र चव्हाण, डॉ. सुभाष दिघे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, यतीन खोत, शिल्पा खोत, अॅड. वैभव चव्हाण, विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाभिक समाज जिल्हा संघटनेच्यावतीने समाज भूषण पुरस्कार विजय सीताराम चव्हाण यांना देण्यात आला. तर मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार विवेकानंद उर्फ स्वामी लाड यांना जाहीर करण्यात आला. त्यांचा मुलगा शुभम लाड याने हा पुरस्कार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला आदर्श नाभिक बांधव पुरस्कार शिक्षक प्रवीण कुबल यांना, तर मनोज चव्हाण कुटुंबीयांना जाहीर केलेला जिल्हास्तरीय (कै.) अरविंद बाली चव्हाण ज्येष्ठ समाजरत्न पुरस्कार आचरा येथील शिवराम उर्फ बबन शेट्ये यांना जाहीर करत त्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसह समाजातील गुणवंत मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांचे आभार मानले. समाज भूषण पुरस्कार विजेते विजय चव्हाण आजची नवीन पिढी नव्या दमाने काम करत असल्याचे पाहून आनंद होत आहे, असे सांगितले. बा. स. लाड यांनी प्रास्ताविक, अॅड. पलाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कांता चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com