election
electionsakal

Chiplun News : लोकसभेच्या विजयाचे गणित उमेदवारावर अवलंबून

दोन्ही मतदारसंघावर नजर ; ठाकूर, राणे, जठार, किरण सामंतांची नावे चर्चेत

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे; मात्र भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळेल, यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे नियोजित वेळेनुसार भाजपाने डाव टाकायला सुरवात केली आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस असे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातील. या वेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेची भाजपला साथ मिळणार नाही. ठाकरे गटाच्या सेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे.

त्यांच्या मदतीसाठी मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले विजय कदम यांची नेमणूक झाली आहे. रायगडमधून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रशांत ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी खासदार नीलेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा आहे. नीलेश राणे यांचा या मतदारसंघात दोनवेळा पराभव झाला आहे. जठार यांची तितकीशी लोकप्रियता नाही. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर भाजपची मदार असेल.

शिंदे गटातील शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांचेही नाव चर्चेत आहे. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय दिल्ली हायकमांड घेणार आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत .

केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी कोणकोणत्या योजना सुरू केल्या, लोकहिताचे कोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते तालुका आणि जिल्हापातळीवर दौरा करत आहेत. बुथ कमिट्यांचा आढावा घेतला जात आहे. मागील निवडणुकीत कोणाला किती मतदान झाले, या वेळी काय केले पाहिजे यावर कार्यकर्ते आणि नेत्यांकडून चर्चा सुरू आहेत.

चिपळूणमध्ये भाजपचा संपर्क मेळावा यशस्वी झाला, ही लोकसभेच्या विजयाची नांदी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजप लढवेल आणि जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या मतदार संघातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पक्ष जो उमेदवार देईल त्याला मतदार निवडून आणतील.
- आशिष खातू, शहरप्रमुख, भाजप, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com