कॅनिंगच्या आंब्याला विक्रमी दर

कॅनिंगच्या आंब्याला विक्रमी दर

00205
पडेल ः येथे कॅनिंगसाठी आंबा येत आहे.


कॅनिंगच्या आंब्याला विक्रमी दर

उत्पादन ३० टक्केच; प्रतिकिलो ६० रुपये देऊनही अपेक्षित माल मिळेना

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः यंदाचा आंबा हंगाम एकीकडे खडतर प्रवास करीत असताना आता दुसरीकडे प्रक्रिया उद्योगासाठी जाणाऱ्या आंब्याचा दर उच्चांकी झाला आहे. यापूर्वीच्या हंगामात कधी न मिळालेला विक्रमी दर यंदा कॅनिंगच्या आंब्याला दिला जात आहे. सुमारे ६० रुपये प्रतिकिलो दर देऊनही अपेक्षित आंबा कॅनिंगला मिळत नाही, अशी स्थिती आहे.
यंदाचा आंबा हंगाम निसर्गाच्या गर्तेत सापडल्याने खडतर प्रवास करीत आहे. एकूण आंबा उत्पादनाच्या सुमारे ३० टक्केच उत्पादन झाल्याचा दावा प्रगतिशील आंबा बागायतदार करीत आहेत. पुरेसे आंबा उत्पादन झाले नसल्याने आंब्याचा सुरूवातीपासून वधारलेला दर अजूनही खाली आलेला नाही. त्यामुळे आंबा खरेदीदारांची मोठी पंचाईत झाली आहे. यंदा आंबा उत्पादन घटल्याने त्याचा थेट परिणाम आंबा हंगामाशी निगडित असलेल्या अन्य पुरक व्यवसायावर झाला आहे. आंबाच कमी असल्याचे बागायतदार सांगत आहेत. त्यामुळे वाशी फळबाजारात आंबा घेऊन जाणाऱ्या आंबा वाहतूक सेवा व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाला होता; मात्र, ऐन थंडीच्या हंगामात आंबा झाडांना पालवी फुटल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली. पुढे झाडांना मोहोर आला; मात्र त्यातून अपेक्षित फलधारणा झाली नाही. त्यामुळे फवारणीवर खर्च करून बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले. हापूस हंगामात प्रक्रीया उद्योगासाठी सिंधुदुर्गात कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. यंदा हापूस हंगाम विविध समस्यांमधून खडतर वाटचाल करीत आहे. अनेक अडथळे पार करीत आंबा हंगाम सुरू आहे. वाशी फळबाजाराबरोबरच राज्यातील अन्य बाजारपेठांमध्ये आंबा विकला जात आहे; मात्र, तुलनेत यंदा हापूसचे उत्पादन कमी असल्यामुळे सुरूवातीपासूनच आंब्याचे बाजारातील दर स्थिर असल्याचे चित्र आहे. एकूणच उत्पादन कमी झाल्याने बाजारात हापूसचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. बाजारातील दर घसरले किंवा मुबलक आंबा झाल्यास आपोआपच प्रक्रीया उद्योगाकडे आंबा वळतो असे सर्वसाधारण चित्र असते; मात्र आंबा कमी आणि दर स्थिर यामुळे प्रक्रीया उद्योगाकडे पुरेसा वळत नसल्याचे दिसते. यातूनच आंबा मिळवण्यासाठी प्रक्रीया उद्योजकांनी दर वाढवले आहेत. दरवर्षी साधारणपणे ३२ रूपयापर्यंत असलेला कॅनिंग आंब्याचा दर यंदा ६० रूपयापर्यंत पोचला आहे. हंगामातील उच्चांकी दर दिला जात आहे. तरीही आंबा मिळत नाही अशी स्थिती आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला दिवसाकाठी सुमारे १५० टन आंबा प्रक्रीया उद्योगाला जात होता. यंदा मात्र अजूनही सुमारे ३० टन आंबाच प्रक्रीया उद्योगाला जात आहे. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कॅनिंग व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते; मात्र अजून कॅनिंग व्यवसाय जोर पकडत नाही अशी स्थिती आहे. आंबा उत्पादन कमी झाल्याने यंदा कॅनिंग व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता दिसते. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी आंबा कॅनिंग उद्योगाने दर वाढवला आहे.
......................
चौकट
कॅनिंग डळमळले
उच्चांकी दर देऊनही पुरेसा आंबा प्रक्रीया उद्योगाकडे वळत नाही. पर्यायाने कॅनिंग हंगाम डळमळल्याने त्यावर उपजिविका करणार्‍या हातांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुरक व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भिती आहे. काही बागायतदारांचा आंबा आता अंतिम टप्यात आला आहे. आंबा नसल्याने हंगामाचे लवकर सूप वाजल्यास प्रक्रीया उद्योगाला मोठा फटका बसेल. बाहेरील कंपन्या कोकणातील पुरेसा आंबा न मिळाल्यास गुजरात तसेच कर्नाटकमधील आंबा घेतील. मात्र, येथील कॅनिंगमुळे स्थानिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत येऊन अर्थव्यवस्था कोलमडेल.
...............
चौकट
आंबा प्रक्रिया उत्पादने महागणार
कॅनिंगचा दर उच्चांकी झाल्याने भविष्यात आपोआपच प्रक्रिया उत्पादनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. लोणची, जाम, पल्प, वडी आदी विविध उत्पादनांचा दर यातून वाढण्याची शक्यता दिसते. याचा फटका भविष्यात ग्राहकांना सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रकिया उद्योगावर चरितार्थ चालवणार्‍या छोट्या कुटुंबानाही याची झळ बसू शकते.
...........
कोट
00206
यंदा कॅनिंगसाठी उच्चांकी दर देऊनही पुरेसा आंबा कॅनिंगसाठी येत नाही. यंदा आंबा उत्पादन घटल्याने कॅनिंगसाठी आंबा येत नाही. फळबाजारातील दर टिकून असल्याने कॅनिंगला आंबा मिळत नाही. दरवर्षी दिवसाकाठी सुमारे १५० टन आंबा कॅनिंगसाठी येत होता. यंदा दिवसाला केवळ ३० टनच येतो. हंगामाच्या प्रारंभी ४८ रूपये तर आता ६० रूपये किलो दर देऊनही आंबा मिळत नाही. आंबा कमी पडल्यास प्रक्रीया उद्योग अडचणीत सापडू शकतात.
- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल
............
00207
यंदा आंबा उत्पादन कमी झाल्याने बाजारातील आंब्याचे दर अजूनतरी टिकून आहेत. फळबाजारासह खासगी ग्राहकांकडून अधिक दर मिळत आहेत. यंदा कधी नव्हे इतका कॅनिंगच्या आब्याला विक्रमी भाव मिळत आहे; मात्र, आंबाच अपुरा पडत असल्याने वाढीव दराचा लाभ घेता येत नाही. आंबा कमी असल्याने कॅनिंगचे दर वधारले आहेत; मात्र, बागायतदारांकडे आंबाच नसल्याने प्रक्रीया उद्योगासाठी कुठून आंबा देणार? असा प्रश्‍न आहे.
- प्रशांत शिंदे, आंबा बागायतदार, कातवण (देवगड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com