विलवडेत विविध धार्मिक कार्यक्रम

विलवडेत विविध धार्मिक कार्यक्रम

विलवडेत विविध धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः विलवडेचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यास मंगळवारपासून (ता. ९) प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता शुक्रवारी (ता. १२) होणार आहे. यानिमित्त ९ ला सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद (माऊली कला क्रीडा मंडळ मळावाडी पुरस्कृत), १० ला सकाळी दहाला मंदिर शिखर कलश प्रतिष्ठा देवता अधिवास, देवता स्थापना, अग्निस्थापना, महाप्रसाद (फौजदारवाडी मित्रमंडळ पुरस्कृत), ११ ला सकाळी श्री माऊली पंचायतन स्थापना मूर्ती, रात्री नऊला दशावतारी नाटक, १२ ला सकाळी श्रींची महापूजा, सायंकाळी हणखणे भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्री नऊला विलवडे बाळगोपाळ नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन माऊली देवस्थान अध्यक्ष बाळकृष्ण दळवी, देवस्थानचे मानकर आणि विलवडेवासीयांनी केले आहे.
...................
‘गुणवंत कामगार’चे सोमवारी अधिवेशन
कणकवली ः राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सोमवारी (ता. ८) सकाळी साडेदहाला राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील गुणवंत कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप साटम व विलास बुचडे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार असून अध्यक्षस्थानी कामगारमंत्री सुरेश खाडे असतील. संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, कामगार कल्याण आयुक्त रविराज इंगळे, प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, सहाय्यक आयुक्त समाधान भोसले, भारतीय कामागर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप उपस्थित असणार आहेत.
..............
सावंतवाडीत महावितरणचे आवाहन
सावंतवाडी : महावितरणतर्फे गंजलेले लोखंडी खांब बदलण्यासाठी शहरात सोमवारी (ता. ८) काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या सावंतवाडी उपअभियंता कार्यालयाने केले आहे. याबाबत तसे प्रसिद्धी पत्रक दिले आहे. सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान सावंतवाडी बाजारपेठ येथील मे. ईगल स्टोअर जवळील उच्चदाब वहिनीचा लोखंडी गंजलेला खांब बदलण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. काम करतेवेळी बाजारपेठ परिसर (गांधीचौक, विठ्ठल मंदिर परिसर, नगरपरिषद परिसर, जयप्रकाश चौक), वसंत प्लाझा भाट बिल्डिंग, दुर्वांकुर बिल्डिंग येथील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. या भागातील ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
--
‘एसटीएस’ परीक्षेत अथर्वचे यश
कणकवली ः सिंपुर टॅलेंट सर्च जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत कासाई माध्यमिक विद्यालयातील सातवीतील विद्यार्थी अथर्व सावंत हा तळेरे केंद्रामध्ये प्रथम आला. अथर्वने या परीक्षेत १३६ गुण प्राप्त करीत रौप्यपदक पटकाविले. या परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना विद्यालयातील एसटीएस परीक्षा विभागातील शिक्षक वाय. एस. परब, पी. जी. पाताडे, पी. वाय. सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. यशवंत विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा सल्लागार प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर आदींनी अभिनंदन केले.
..................
कोळंबला बुधवारी आरोग्य चिकित्सा
मालवण ः कोळंब-लाडवाडी येथील महादेवी, आकार सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी १० मे रोजी सकाळी नऊला कोळंब येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यावेळी डॉ. प्रशांत पवार, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळंब, सहकारी वृंद, डॉ. गुरुप्रसाद लाड, कणकवली-फोंडा, डॉ. विशाल लाड, मुंबई आदी रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरात हिमोग्लोबीन, थायरॉईड, कॅल्शियम, शुगर, बीपी, बीएमडी हाडांची घनता या आजारांवर तपासणी केली जाणार आहे.
---
‘प्रेरणाभूमी’ची बुधवारी बैठक
सावंतवाडी ः समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीची बैठक बुधवारी (ता. १०) सकाळी साडेदहाला ओरोस येथील जिल्हा बँकेसमोर डी. के. पडेलकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या नियोजित कार्यक्रमाचे नियोजन, प्रेरणाभूमीच्या रचनात्मक कामाबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com