रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

स्वतः बागेत आग लावल्याने इतरांच्या बागांना झळ
पावस ः तालुक्यातील दाभिळ आंबेरे येथे स्वतःच्या बागेत लावलेल्या आगीमुळे आग पसरत जाऊन इतर साक्षीदार व फिर्यादी यांच्या बागेचे नुकसान झाले. या प्रकरणी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन विठ्ठल कदम, ख्रस्तिना नितीन कदम (दोघेही रा. शिवारआंबेरे, जाकादेवी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २६ एप्रिलला सकाळी आठ वाजता दाभिळ- आंबेरे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्वतःच्या बागेत आग लावली होती; पण ती आग न विझवता तशीच जाणूनबुजून सुरू ठेवली. त्यामुळे परिसरातील संशयितांसह इतर काजू बागायतदार फिर्यादी, साक्षीदार यांच्या बागेला आग लागून नुकसान झाले. याप्रकरणी फिर्यादी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------

विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू
पावस ः येथील गणेशगुळे येथे लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पडिक जमिनीतील विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. जगन रामचंद्र म्हादये (वय ५०, रा. कुर्धे-खोतवाडी, रत्नागिरी) असे विहिरीत पडलेल्या मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता.४) रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगन म्हादये हे लग्नपत्रिका वाटण्यासाठी गणेशगुळे येथे गेले होते. चालत असताना एका पडिक विहिरीत पडले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून पावस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पूर्णगड पोलिस अंमलदार करत आहेत.

------

संशयास्पदरीत्या फिरणारे दोघे ताब्यात
चिपळूण ः शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना येथील नागरिकांनी चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले. ते दोघे काश्मिर राज्यातील आहेत. आर्थिक मदत गोळा करण्यासाठी ते शहरात फिरत होते. गोवळकोट धक्क्यावर हे दोघे आज सकाळी आले तेव्हा नागरिकांनी त्यांची चौकशी केली. गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीतील हे संशयित आरोपी असल्याची अफवा पसरली होती. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे आधारकार्डांचीही मागणी केली. त्यांच्या आधारकार्डवर काश्मिरचा पत्ता आढळून आला. नागरिकांनी त्यांना मारू नये, तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून सामाजिक कार्यकर्ते गुलमोहमद शाह यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हे दोघे तरुण शहरातील मुकादम लॉजवर काही दिवसांपासून राहत आहेत.
-------------

जॅकवेलमधील पाण्याच्या पंपाची चोरी
खेड ः तालुक्यातील भडगाव-खोंडे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नारंगी नदीवरील जॅकवेलमधील पाणी खेचणारा पाण्याचा पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. या प्रकरणी सुधीर देवजी शिंदे यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुधीर देवजी शिंदे हे भडगाव-खोंडे ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा करणारे कर्मचारी असून, शुक्रवारी सकाळी ६ वाजता सुमारास पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना पंप चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
---

भरणेनाकामध्ये जुगार अड्ड्यावर छापा
खेड ः भरणेनाका येथील पुलानजीकच्या सुरू असलेल्या बेकायदेशीर व विनापरवाना पैसे लावून पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. रोशन लक्ष्मण मोरे (वय ३५, रा. लवेल), कृष्णा शेतीबा कुराडे (वय ३०, रा. दस्तुरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. भरणेनाका येथील ओव्हरब्रिजखाली अवैध बेकायदेशीर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हा छापा टाकला
--

कारची दुचाकीला धडक
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील गुणदे फाटा येथे मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी कारचालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश प्रकाश महाजन (वय ३४, रा. करीरोड, मुंबई) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. महाजन हे आपल्या ताब्यातील कार (एमएच ०१, डीआर ०६६५) ही कार घेऊन जात असता दुचाकी (एमएच ०४, केक्यू १९७७) हिला जोरदार धडक देऊन अपघात केला होता. यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com