Barsu Refinery
Barsu Refinerysakal

Barsu Refinery : बारसू पंचक्रोशीतील कातळशिल्पे चर्चेत; युनिस्कोच्या वारसा यादीत नोंद

युनिस्कोच्या वारसा यादीत नोंद ; आशिया खंडातील मोठ्या चित्रांमध्ये बारसूतील शिल्प

राजापूर : तालुक्यातील बारसू-धोपेश्‍वर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या माती परीक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. रिफायनरी प्रकल्पावरून समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या आराखड्याचे चित्र स्पष्ट होत नसले तरी प्रकल्प परिसरामध्ये कातळशिल्प येत आहेत की नाहीत, त्यांच्यावर प्रकल्पाचा परिणाम होणार की नाही याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

असे असले तरी, मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारा सांस्कृतिक ठेवा आणि युनोस्कोने जागतिक वारसा जपणाऱ्‍या वास्तूंच्या यादीमध्ये नोंद केलेली बारसूसह या भागातील विविध गावांच्या परिसरातील सड्यावरील विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे चर्चेत आली आहेत.

कोकणातील मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारा हजारो वर्षापूर्वीचा ठेवा असलेली कातळशिल्प रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये सापडली आहेत आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील गोवळ, साखरकोंबे, बारसू, सोलगाव, देवाचेगोठणे, उपळे, भालावली, सोगमवाडी, देवीहसोळ, विखारेगोठणे, रूंढे आदी ठिकाणी सापडलेल्या कातळशिल्पांमध्ये दोनशेहून अधिक कातळशिल्पांचा समावेश आहे.

निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड, धनजंय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी कधी स्वतः संशोधन करून, कधी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने शोधलेल्या या कातळशिल्पांमध्ये विविध प्राणी, भौमेतिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती व दिशादर्शक खुणा आदींचा समावेश आहे.
बारसू, गोवळ, देवाचेगोठणे परिसरातील सड्यावर सुमारे ६० चौ. कि. मी क्षेत्रफळाच्या सड्यावरील वैविध्यपूर्ण कातळखोद चित्रे अष्मयुगीन मानवनिर्मित असल्याचे संशोधक, तज्ञांकडून सांगितले जाते.

त्यामध्ये बारसू-पन्हळे भागातील तारवाच्या सड्यावर असलेले कातळशिल्प आशिया खंडात आढळून येणाऱ्‍या सर्वात मोठ्या खोदचित्र रचनांपैकी एक चित्ररचना असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ५७ फूट लांब व १४ फूट रूंदीच्या या रचनेसोबत विविध आकृत्यांचा समूह येथे आढळून येतो.

दोन वाघांमध्ये मानवसदृश्य आकृती

गोवळ परिसरातील सड्यावरील प्राणी-पक्षी, भौमितिक रचनांच्या कातळशिल्पांचा समावेश आहे. बारसूच्या सड्यावरील सध्या चर्चेत असलेल्या कातळशिल्पामध्ये दोन वाघांच्यामध्ये एक मानवसदृश आकृती कोरलेली दिसून येते. हे चित्र सुमारे १७.५० मीटर लांब तर ४.५० मीटर रूंद जमिनीवर कोरलेले आहे.

देवाचेगोठणेत चुंबकीय विस्थापन

देवाचेगोठणेच्या सड्यावर चुंबकीय विस्थापन हे वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प असून येथील सुमारे ५०० चौरस मीटर परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई चुकीचे दिशा दर्शन करते. द्वितीयक जांभा दगडात चुंबकीय विस्थापन दर्शवणारी ही जगातील एकमेव जागा असल्याचे सांगितले जात आहे.

सोगमवाडी, सोलगावमध्ये प्राण्यांचे दर्शन

सोगमवाडी, सोलगाव या गावांच्या सड्यावरील चित्ररचनांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांचे दर्शन होते. येथील रचनेमध्ये वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. या चित्ररचनांमधील गवारेडा, हत्ती, एकशिंगी गेंडा यांच्या रचना तत्कालीन कालखंडातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानावर यांच्या भाष्य करणारी दिसून येतात.

मानवी संस्कृतीचा उलगडा करणारी कातळखोद चित्र ठिकाणे आंतरराष्ट्रीय पर्यटनदृष्ट्या खूप महत्वाची आहेत. ती ठिकाणे विकसित केल्यास निश्‍चितच अर्थकारणाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यासाठी साऱ्यांचाच सकारात्मक सहभाग आणि प्रयत्नांची गरज आहे.
- धनंजय मराठे, संशोधक कातळखोद चित्र

दृष्टीक्षेपात
-
अकरा गावांमध्ये आढळली आहेत शिल्पे
-दोनशेहून अधिक खोदचित्रे

- प्राणी, भौमेतिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती व दिशादर्शक खुणा
-मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारे ठेवा
-प्रकल्प आराखड्याची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com