गावपारध पडल्यावरच भाजावळ सुरू

गावपारध पडल्यावरच भाजावळ सुरू

ratvardha15.txt

इंट्रो
---
कोकणातील गावागावात अनेक प्रथा का आणि कशा सुरू झाल्या, हे सांगणे अभ्यासकांनाही कठीण आहे. परंपरेने त्या चालत आलेल्या आहेत म्हणून त्या पाळल्या जातात; मात्र अनेक प्रथा अधिक उत्साहाने पाळल्या जातात तर काही काळाच्या ओघात आधुनिकतेच्या स्पर्शामुळे मागे पडत आहेत; मात्र या प्रथांमागे देव गावाचे रक्षण करतो, देव आपला तारणहार आहे, त्याचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत ही भूमिका सातत्याने असते. पारध ही अशापैकीच एक. लांजा तालुक्यातील काही गावांतून पारध पडल्याने भाजावळ सुरू केली जाते; मात्र कालानुरूप यात बदल झाले असून आता प्रत्यक्ष पारध न करता ती प्रतिकात्मक केली जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांची हत्या टळते. पारध म्हणजे शिकार नव्हे, हे जाणत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

--दीपक नागवेकर, लांजा


गावपारध पडल्यावरच भाजावळ सुरू

गाव म्हटलं की, तेथे साऱ्या रूढी परंपरा जोपासल्या जातातच. अजूनही काही गावांनी गावपण जपले आहे. परंपरागत चालत आलेल्या रितीभाती आजही कोकणातल्या असंख्य गावात पाळल्या जातात किंबहुना तसा दंडकही असतो. एक काळ असा होता की, या परंपरा न पाळणाऱ्या कुटुंबाला बाहेर काढले जात होते. गावाच्या नियमाप्रमाणे वागणे सर्वांना बंधनकारक होते. कोकणातील सण, उत्सव आगळेवेगळे असतात मग तो गणेशोत्सव असो अथवा शिमगा. त्यातही गावपारध हा एक वेगळा विषय आहे. पारध या शब्दात एक उत्सुकता आहे. पारध या शब्दाची उत्पत्ती कोकणात नेमकी कशी झाली असेल सांगता येणार नाही; पण गावपारध म्हटलं की, कोकणातली अस्सल माणसं व गाव उभे राहतात.
लांजा तालुक्यातील आजही काही गावांमध्ये गावपारध काढली जाते. गावपारध आणि शिकार यांचा तसा काहीही संबंध नाही. गावपारध ही देवदेवतांशी आणि गावांच्या रूढी-परंपरांशी निगडित आहे तर शिकार केवळ स्वतःच्या इच्छेखातर, चैनीसाठी केलेली बाब आहे. गावपारध म्हटलं की, त्यात अख्ख गाव येतं. जेव्हा अख्खा गाव उभा राहतो तेव्हा गावपारधीचा कौल देवतांकडून घेतला जातो. तसं पाहिलं तर कौल घेणे आहे त्यातला महत्वाचा पहिला टप्पा आहे. गावच्या देवळात जमण्यासाठी गावात एक माणूस फिरवला जातो. त्या काळी दवंडी दिली जायची. थोडक्यात काय तर गावातल्या प्रत्येकाला देवळात हजर राहण्याचा आदेश दिला जातो. गावात बारा मानकरी, पाच गावठे आणि त्यांचा प्रमुख गावकर अर्थात् कारभारी असतो. ही माणसं गावाच्या अग्रस्थानी असतात. ग्रामदेवतेला कौल लावण्याअगोदर जाप केला जातो. या जापाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार प्रत्येक गावानुरूप वेगळा आहे; मात्र त्या सर्वांचे सार एकच असते.
देवतेला कौल लावला जातो. सर्वसाधारणपणे देवतांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाच पाच भाताचे गोटे लावले जातात. त्यातील मधला गोटा पडला की, देवतांनी गाव पारधीला कौल दिला, असं गृहित धरले जाते. संपूर्ण गाव मात्र हे पाहत असतो. त्यांच्यासमोर गावपारध का काढली जात आहे, हे सांगितले जाते. देवांनी तसा कौल दिला असून, सर्व जबाबदारी घेतली असल्याचे गावकर सांगतात. गावकऱ्यांनी सांगितलेला शब्द अंतिम असतो. गावपारध का काढली जाते, त्याचा नेमका रयतेला फायदा काय असतो की केवळ परंपरा जोपासण्यासाठी पारध काढली जाते, हे नेमके स्पष्ट होत नाही; मात्र लांजा पूर्व भागातील एक गावकर बोलताना असे म्हणतात, "आमच्या वाडवडिलांनी चालवलेली ही परंपरा आहे. रयतेच्या कुटुंबाची जबाबदारी देव घेतो. आम्ही आजही देवाला विचारून गावचे कार्य हाती घेतो. गावाला शेतीसाठी भाजावळीचा निर्णय द्यायचा असला तरी आम्ही कौल घेतो. कौल घेताना पारध झाली तर खरं समजले जाते. म्हणजेच खऱ्या-खोट्याचा निर्णय आम्ही देवासमोर घेतो. आम्ही आजही पूर्वजांनी चालवलेली ही परंपरा टिकून ठेवलेली आहे.
कोकणात प्रत्येक गावात परंपरा वेगवेगळ्या आहेत. तसे गावपारधीचे प्रकारही वेगळे. काही गावात बंदूक घेऊन गाव पारध काढली जाते. बंदूक असणाऱ्या व्यक्तीला बरखनदार म्हणून ओळखले जाते. या गावपारधीचा प्रमुख तोच असतो. कारण, सर्व पारधीची मदार यांच्यावर असते. पूर्वी ठासणीच्या बंदुका वापरल्या जात; मात्र आज या बंदुका इतिहासजमा झाल्या आहेत. या बंदुका तशा घातकी ठरत. कारण, त्यातून कधी कधी जनावर दिसलं तर बार उडेलच, असे सांगता येत नसे. या बरकंधाराबरोबर काही रानकी असतात. रानकी म्हणजे रान काढणारे... यांचं काम असतं. रानात फिरून जनावराला उठवणे. आता जनावर म्हणजे डुक्कर ...ज्या भागात पारधीला जायचे ठरते त्या ठिकाणाच्या चारही दिशांनी हे रानकी सुरवात करतात. रान उठवायला सुरवात झाली की, मग प्रत्येकजण दक्ष राहतो. या रानकीकडे काठी हे एकमेव हत्यार असते. काहीजणांच्या कमरेला कोयती बांधलेली असते. या रानक्यांना फार लक्ष ठेवावे लागते. कारण, जनावर कुठून उठेल सांगता येत नसते. यासाठी इशारे ठरलेले असतात. या रानक्यांसह टेळके अर्थात् टेहळकी असतात. ते उंच झाडावर बसून लक्ष ठेवत असतात. या टेहळक्यांचे काम दुर्बिणीप्रमाणे असते. खूप दूरवर नजर लावून बसलेले असतात. जनावर उठले की, इशारा होतो, खाणाखुणा होतात. बरखनदार आपल्या लक्ष्यावर चाप रोखून असतो. लक्ष्य समोर येतात बार होतात. नुसता आवाज झाला तरी रानकी तयार होतात आणि आवाजाच्या दिशेने धावू लागतात. पारध पडलेली असते. त्यानंतर गावाला इशारा दिला जातो. साधारणपणे तीन बार काढले जातात. याचा अर्थ स्पष्ट असतो की, पारध पडलेली असून सर्व पारधी सुरक्षित आहे. गावाला इशारा दिल्यावर गावात थांबलेले लोक ताशे, ढोल घेऊन सीमेजवळ येतात. वाजतगाजत पारध गावकरांच्या घराजवळ आणतात. थोड्या विश्रांतीनंतर पारध देवाजवळ आणली जाते. कोयता लावण्यासाठी हुकूम दिला जातो. त्याच्यासोबत बारा मानकरी, पाच गावठे, मुख्य कारभारी हात लावतात. हात यासाठी लावला जातो की, आम्ही तुझ्यासोबत आहोत याची त्यामध्ये खात्री असते. वाटे लावणे हाही महत्वपूर्ण भाग असतो. कारण, मानकरी, गावठी, कारभारी यांचे वाटे लावले जातात. वाटे म्हणजे मटणाचे भाग. या सर्वांसह रान काढणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र वाटे लावले जातात. त्यानंतर इतर रयतेसाठी उंबऱ्याप्रमाणे वाट्यांचे नियोजन केलेले असते. गावपारधीचा हा शेवटचा भाग असतो.
गावपारधीचा इतिहास पाहिला तर बंदुकीच्या शोधाच्या अगोदर भाल्याचा वापर केला जात असे तर काही गावात हल्ली काही काळापर्यंत दांडक्यांचा वापर करून पारध केली जात होती. आज दांडक्याने पारध करण्याची परंपरा जवळजवळ संपलेली आहे. गाव कोणतेही असू द्या त्या परंपरा कोकणात निष्ठेने पाळल्या जातात. त्या पारधीमध्ये डुक्कर, भेकर, ससा यांचीच गावपारध केली जाते. काही गावांमध्ये तर प्रतिकात्मक गावपारध केली जाते. जनावराच्या वेशात माणसं भूमिका बजावत असतात आणि केवळ देवासमोर प्रतिकात्मक गावपारध झाल्याचे भासवले जाते. आजच्या काळातही वेगळे असले तरी काही गावांनी परंपरा जोपासलेली आहे. त्यांची निष्ठा आपल्या देवदेवतांशी आहे. त्यांचा प्रचंड विश्वास आपल्या देवावर आहे. आमचा देवच आम्हाला तारून देतो, असे ते अभिमानाने स्पष्टपणे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com